प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी नेमण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाचा कालावधी सहा महिन्यांनी वाढविण्यात आला आहे. राज्य सरकारने 19 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त मुख्य सचिव सुधाकर राव यांच्या अध्यक्षतेखालील सातवा वेतन आयोग स्थापन केला होता. या आयोगाला सहा महिन्यात अहवाल देण्याची सूचना करण्यात आली होती. या आयोगाने दोन महिन्यांपूर्वी अंतरिम अहवाल दिला होता. त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्के अंतरिम वेतनवाढ देण्यात आली होती. आता या आयोगाला कामकाज पूर्ण करुन अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 29 मे पासून सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यपालांच्या नावे अर्थ खात्याच्या उपसचिवांनी मंगळवारी या संबंधीचा आदेश जारी केला आहे.









