माजी काँग्रेस अध्यक्षांविरुद्ध झारखंडमध्ये 3 खटले सुरू..
वृत्तसंस्था/ रांची
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात झारखंडमध्ये एकूण तीन न्यायालयीन खटले सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी दिलासा देण्यासाठी झारखंड उच्च न्यायालयात पोहोचलेल्या राहुल गांधी यांच्या रद्दबातल याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत मंगळवार, 16 मे रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण होऊन न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला.
झारखंड उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीच्या खटल्याचा निकाल राखून ठेवला आहे. मंगळवारी न्यायमूर्ती अंबुजनाथ यांच्या न्यायालयात ही सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही पक्षांना बुधवारपर्यंत युक्तिवादाचा सारांश सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. राहुल गांधींनी चाईबासा येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर एका स्थानिक भाजप नेत्याने मानहानीचा खटला दाखल केला होता. 2018 मध्ये राहुल गांधींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अमित शहा यांच्याविरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी चाईबासा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. काँग्रेसच्या दिल्ली अधिवेशनातील राहुल गांधींच्या विधानाशी संबंधित हे प्रकरण आहे. ‘काँग्रेसमध्ये कोणीही खुनी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, फक्त भाजपमध्ये खुनी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो’ या राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. झारखंडमध्ये चाईबासा आणि रांची या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राहुल गांधींच्यावतीनेही झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर पुढील सुनावणी 18 मे रोजी होणार आहे.
अमित शहा यांच्याविरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी अर्जदार नवीन झा यांच्यावतीने रांची दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी दिलासा देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
2019 च्या एका खटल्याची कनिष्ठ न्यायालयात सुनावणी
राहुल गांधींवर झारखंडमध्ये तीन केसेस आहेत. ज्यात एक प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातील आहे. याप्रकरणी तक्रारदार प्रदीप मोदी यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. मोदींविरोधातही टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधींच्यावतीने झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने सुनावणीअंती याचिका फेटाळून लावली असून आता या प्रकरणातही कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू आहे.









