वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा यांची नियुक्ती भारतीय भू सेनेच्या पश्चिम कमांडचे प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. ले. ज. शर्मा यांनी आपल्या नियुक्तीनंतर वीरस्मृती युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन स्मारकाला अभिवादन केले. भू सेनेच्या अधिकृत वक्तव्यात ही माहिती देण्यात आली आहे. ले. ज. शर्मा हे राष्ट्रीय संरक्षण संस्थेचे विद्यार्थी असून भारतीय सेना संस्थेतही त्यांनी शिक्षण घेतले आहे. तीन दशके ते सेवेत आहेत.
भारतीय भू सेनेतील त्यांच्या सेवेचा गौरव त्यांना सेनापदक प्रदान करुन करण्यात आला आहे. ते अतिविशिष्ट सेनापदक आणि संयुक्त राष्ट्र सेनेच्या कमांडर कमेंडेशन यांचेही विजेते आहेत. पश्चिम कमांडचे प्रमुख या नात्याने आता त्यांच्यावर अनेक आव्हाने पेलण्याचे उत्तरदायीत्व आलेले आहे.









