सामनावीर स्टोईनिसचे तुफानी नाबाद अर्धशतक, बिश्नोई-ठाकुर-मोहसिनचा भेदक मारा, इशान किशनचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था / लखनौ
सामनावीर मार्कस स्टोईनिसचे तुफानी नाबाद अर्धशतक, गोलंदाजांनी केलेला अचूक मारा व अप्रतिम क्षेत्ररक्षण यांच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलमधील चुरशीच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सवर केवळ 5 धावांनी मात करीत गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
मुंबईकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर लखनौने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 177 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 5 बाद 172 धावांवर रोखत या मोसमातील सातवा विजय मिळविला. 15 गुणांसह ते आता तिसऱ्या स्थानावर असून मुंबई 14 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरले आहे. चेन्नईचेही 15 गुण झाले असले तरी लखनौपेक्षा त्यांची सरस धावगती असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

मुंबईला कर्णधार रोहित शर्मा व इशान किशन यांनी दमदार सलामी देत 9.4 षटकांत 90 धावांची भागीदारी केली, तेव्हा ते हा सामना सहज जिंकतील असे वाटले होते. पण हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईच्या अन्य फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. इशान किशनने फटकेबाजी करीत 39 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 59 तर रोहितने 25 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा फटकावल्या. शेवटच्या षटकात मुंबईला 11 धावांची गरज होती. पण मोहसिन खानने अचूक मारा करीत ग्रीन व डेव्हिड यांना फटकेबाजीची संधीच दिली नाही. त्याने या षटकात केवळ 5 धावा देत लखनौचा विजय साकार केला. डेव्हिड 19 चेंडूत एक चौकार, 3 षटकारांसह 32 धावांवर नाबाद राहिला तर ग्रीनने 6 चेंडूत नाबाद 4 धावा केल्या. नेहल वधेराने 20 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा काढल्या तर अवांतराच्या रूपात मुंबईला 15 धावा मिळाल्या. लखनौच्या रवी बिश्नोईने 26 धावांत 2, यश ठाकुरने सूर्यकुमारच्या महत्त्वाच्या बळीसह 2 गडी टिपले. ऑफच्या दिशेने सरकत सूर्याने फाईनलेगच्या दिशेने चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मारलेला चेंडू थेट यष्टीवर लागल्याने तो बाद झाला. त्याने 7 धावा केल्या. मुंबईचा एकच सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार असून प्लेऑफमध्ये राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
स्टोईनिसची आतषबाजी
तत्पूर्वी, लखनौची सुरुवात खराब झाली. 2 बाद 12 व नंतर 3 बाद 35 अशा स्थितीनंतर स्टोईनिस व कृणाल पंड्या यांनी चौथ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी करीत संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. पण कृणाल पंड्या जखमी झाल्याने तो निवृत्त झाला. त्याने 42 चेंडूत 49 धावा जमविताना 1 चौकार, 1 षटकार मारला. त्याने स्टोईनिसला जास्त स्ट्राईक देण्याचे धोरण ठेवले होते. स्टोईनिसने आपल्या पॉवरहिटिंगचा दणका देताना मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला, विशेषत: वेगवान गोलंदाजांचा. त्याने केवळ 47 चेंडूत 89 धावा झोडपताना 4 चौकार व 8 षटकारांची आतषबाजी केली.

या मोसमात दुहेरी स्वभावाच्या खेळपट्टीवर फलंदाजांना फटकेबाजी करणे कठीण गेल्याचे दिसून आले आहे. लखनौतर्फे सर्वाधिक धावा जमविणाऱ्या काईल मेयर्सला या सामन्यात वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पण त्यांची ही चाल फारशी यशस्वी ठरली नाही. त्याच्या जागी घेतलेला हुडा 5 धावा काढून बाद झाला तर डी कॉक 16 धावांवर बाद झाला. प्रेरक मंकडने थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण बेहरेनडॉर्फच्या या अप्रतिम चेंडूवर तो यष्टिरक्षकाकरवी शून्यावरच झेलबाद झाला. डी कॉक चावलाच्या गुगलीवर ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात सातव्या षटकात यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाल्यानंतर त्यांची स्थिती 3 बाद 35 अशी झाली होती. यानंतर मात्र स्टोईनिस व कृणाल यांनी डाव सावरताना 82 धावांची भागीदारी केली. 16 व्या षटकात कृणाल पायाला इजा झाल्याने निवृत्त झाला. तो तंबूत परतल्यानंतर स्टोईनिसने तुफानी फटकेबाजी सुरू केली.
स्पिनर्स रितिक शोकीन व चावला यांना लागोपाठच्या षटकात षटकार मारतच त्याने आक्रमण सुरू केले. या खेळपट्टीवर फटकेबाजी करणे तसे अवघडच होते. पण स्टोईनिसने ताकदीचा वापर करीत धावा वसूल केल्या. जॉर्डनने टाकलेल्या 18 व्या षटकात त्याने 24 धावा झोडपल्या. या षटकात त्याने 3 चौकार व 2 षटकार ठोकले. आकाश मधवालला एकहाती षटकार मारत त्याने डाव संपवला. मुंबईने शेवटच्या तीन षटकांत तब्बल 54 धावा दिल्या. त्यांच्या बेहरेनडॉर्फने 2 तर चावलाने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 3 बाद 177 : दीपक हुडा 5, डी कॉक 15 चेंडूत 16, प्रेरक मंकड 0, कृणाल पंड्या दुखापतीमुळे निवृत्त 49 (42 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), स्टोईनिस 47 चेंडूत 4 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 89, पूरन नाबाद 8, अवांतर 10. गोलंदाजी : बेहरेनडॉर्फ 2-30, चावला 1-26.
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 5 बाद 172 : रोहित शर्मा 25 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 37, इशान किशन 39 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 59, सूर्यकुमार यादव 9 चेंडूत 7, नेहल वधेरा 20 चेंडूत 16, टिम डेव्हिड 19 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 32, विष्णू विनोद 2, ग्रीन 6 चेंडूत नाबाद 4, अवांतर 15. गोलंदाजी : बिश्नोई 2-26, यश ठाकुर 2-40, मोहसिन खान 1-26.









