अध्याय सत्ताविसावा
भगवंत उद्धवाला पुजाविधीबद्दल म्हणाले, अभेदभक्तीने बाह्य पूजेकरिता प्रतिमेस आवाहन करावे. माझी सारी चैतन्यशक्ती त्या प्रतिमेत आली आहे अशी भावना करावी. ह्यालाच ‘आवाहन’ असं म्हणतात. ह्याला प्राणप्रतिष्ठा करणे असेही म्हणतात. तो विधी पूर्ण होण्यासाठी गुरूच्या मुखातून मिळालेल्या निर्दोष मंत्राने मूर्तीच्या सर्वांगावर, शास्त्राsक्त मंत्र म्हणून सर्व न्यास सावकाश करावेत. त्यापूर्वी माझ्यासाठी दर्भ इत्यादी नऊ गुणांनी युक्त आसन तयार करावे. त्या आसनावर एक अष्टदळ कमळ तयार करून त्याचा मध्यभाग पिवळा करावा. त्यावर मूर्ती ठेवून पाद्य, आचमनीय, अर्घ्य इत्यादी उपचार अर्पण करावेत. पूजा करत असताना त्यातील काही गोष्टी कल्पनेने मनात उभ्या करायच्या असतात. उदाहरणार्थ, स्नानमंडपाची कल्पना करून तेथे चित्स्वरूप देवाला आणावे आणि पाद्य, अर्घ्य, आचमन, मधुपर्क, इत्यादि विधान करावे. अभ्यंगाने अंगमर्दन करावे. नंतर पुरुषसूक्ताने यथोक्तस्नान घालावे आणि स्नानाच्या मंडपातच देवाला पीतांबर नेसवावा. नंतरचे यथोक्त पूजन सिंहासनावर करावे. त्यासाठी आवश्यक ते आसन व पीठावरण (म्हणजे पीठाला वेष्टून राहणाऱ्या देवता) यांची कल्पना करावी. त्याच्याखाली सुरेख रत्नखचित मंडप, त्यात सुवर्णाचा मंचक आहे अशी कल्पना करावी. त्या मंचकावर अत्यंत सुंदर व शोभिवंत असे शेषाचे वेटोळे असून पाठीमागे छत्रासारख्या लागलेल्या त्याच्या हजार फणा त्यांतील रत्नांच्या दिव्यतेजाने झळकत आहेत अशी कल्पना करावी. पुढे शेषाच्या वेटोळ्यामध्ये देठासह निर्मळ लाल कमळ उमलले आहे, त्याला आठ पाकळ्या असून ते मनोहरपणाने शोभत आहे असे दृश्य डोळ्यासमोर आणावे. ते अत्यंत सुंदर कमळ असून षड्विकार हे त्याचे केसर होय आणि वैराग्य हा त्यातील घमघमीत मकरंद होय. पूर्वादि अष्ट दिशांच्या, अष्टधा प्रकृतीच्या कमळदळांमध्ये त्या त्या देवतांचा न्यास करावा. याप्रमाणे अनुपम कल्पनेने रचलेल्या कमलाच्या मध्यभागी नवव्या अनुग्रहेची स्थापना करावी. सावकाश मंत्रयुक्त पीठान्यास करून देवाधिदेवाला सिंहासनावर आणावे. छत्र आणि दोन चवऱ्या यासह नानाप्रकारच्या वाद्यांच्या जयजयकारयुक्त गजरात पीठ व मुद्रा नीट दाखवून श्रीहरीला आसनावर बसवावे. भगवंत अभेद भक्ताने सुरु केलेला पूजाविधी अत्यंत आनंदाने स्वीकारतात वास्तविक पाहता ते तर सर्व जगाचे स्वामी आहेत, निर्गुण निराकार आहेत तरीही भक्ताने त्याच्या कल्पनेने उभे केलेले सगुण रूप आणि देऊ केलेले सर्वस्व त्यांना लाख मोलाचे वाटते. त्याबद्दल कौतुकोद्गार काढताना ते म्हणतात, उद्धवा, अरे मी सर्वव्यापी असून सर्वत्र बोलावण्यापूर्वीच हजर असतो तरीही मला आवाहन करून बोलावतात, मी सर्वाधीष्टीत आहे तरीही मला आसन देतात, मला निर्विकाराला विकार-मुद्रा दाखवितात, मज ज्ञानस्वरूपाला डोळे, नि:शब्दाला कान व मला विश्वतोमुखाला सुंदर मुख आहे अशी कल्पना करतात. मी विश्वपाद असताना दोन पायांनी चालतो, मला विश्वबाहूला चार हात आणि सर्वगताला एकदेशी स्थान कल्पितात, मज निरुपचाराला उपचार, मज विदेहाला अलंकार व सर्वत्र सम असणाऱ्याला शत्रु-मित्र, अशा विचित्र कल्पना करतात. मज अकर्त्याला कर्मबंधन, अजन्म्याला जन्म-निधन, नित्यतृप्ताला भोजन आणि निर्गुणाला सगुण अशी कल्पना करतात. ह्या साऱ्यांचे तात्पर्य हेच की, उपासनाकांडाचा निर्वाह व्हावा. उपासकांचा जसा भाव असतो, तसा मी देव होतो. मी पूर्णकाम असताही भक्ताच्या प्रेमासाठी सकाम होतो. भक्तांचा जसा मनोभाव असतो, त्याप्रमाणेच मी पुरुषोत्तम त्यांना दिसतो. भक्त जशी माझी भावना करतो, तसाच मी होतो. तो जे जे मला भावार्थाने अर्पण करतो, ते ते मला सहजच पोचते. मी सर्वत्र भरलेलाच आहे पण भक्त मला उद्देशून भक्तीने अर्पण करावयाला जेथे बसेल, तेथे मला ते अनायासे सहजच अर्पण होते.
क्रमश:








