निसर्ग हा स्वत:च इतका विलक्षण आहे की त्याच्या क्रियाकलापांची कल्पनाही करता येणे अशक्य आहे. प्रत्येक जीवाला त्याने त्याचे संरक्षण, संवर्धन आणि प्रगती करण्यासाठी अंगभूत साधने आणि कौशल्ये दिली आहेत. विशेषत: पक्षी हा निसर्गाचा एक चमत्कार आहे, असेच म्हणावे लागते. काही काही पक्षांची घरटी इतकी सुबक आणि कौशल्यपूर्ण असतात की आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही.
एक प्रकारची चिमणी अशी आहे, की जी आपले घरटे गवताच्या काड्या एकमेकांमध्ये विणून नव्हे, तर निसर्गात सापडणाऱ्या पसरट वस्तू शिवून तयार करते. शिवण्यासाठी ती आपल्या चोचीचा उपयोग सुईसारखा करते. असा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. काही लाख लोकांनी तो पाहिला आहे. झाडाची दोन जवळजवळची पाने ही चिमणी गवताच्या काडीने शिवते. ओल्या गवताची काडी चोचीत धरुन ती त्याचा उपयोग शिवायला लागणाऱ्या दोऱ्यासारखा करते. हे घरटे अधिक मजबूत आणि पावसात किंवा वाऱ्यातही न पडणारे आणि न फाटणारे असते. त्यामुळे तिची अंडी आणि नंतर पिले त्यात अधिक सुरक्षित राहतात. ही चिमणी एखाद्या कुशल शिंप्याप्रमाणे टाके घालून पाने शिवून आपल्या पिलांची सुरक्षितता जपताना दिसून येते. चिमणीचा हा प्रकार ‘टेलरबर्ड’ या नावाने ओळखला जातो. हा व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांनी त्याखाली अतिशय सुरेख टिप्पण्याही केलेल्या असल्याचे दिसून येते.









