कंपनी 3 वर्षांत 11,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता : सीईओ व्हॅले यांनी केला खराब कामगिरीचा उल्लेख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन ग्रुपने नुकतीच टाळेबंदी जाहीर केली आहे. वृत्तानुसार, समूहाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्गेरिटा डेला व्हॅले यांनी सांगितले की कंपनीतील जवळपास 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना तीन वर्षांच्या कालावधीत टप्याटप्याने कमी केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
डेला व्हॅले यांचा विश्वास आहे की दूरसंचार कंपनीने यावर्षी रोख प्रवाहात 1.5 अब्ज युरो कमी होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर कर्मचारी कपातीचा हा बदल आवश्यक आहे. डेला व्हॅले यांची गेल्या महिन्यातच कंपनीत कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्राहक, साधेपणा आणि वाढ : डेला व्हॅले म्हणाल्या, ‘कंपनीची कामगिरी चांगली राहिलेली नाही. माझे प्राधान्य ग्राहक, साधेपणा आणि वाढ आहे. आमची स्पर्धात्मकता परत मिळवण्यासाठी आम्ही आमच्या संस्थेची प्रक्रिया सुलभ करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या 1 लाख कर्मचारी
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, कंपनीसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी टाळेबंदी असेल. व्होडाफोनमध्ये सध्या 1 लाख कर्मचारी आहेत. दूरसंचार कंपनीने चालू आर्थिक वर्षात 3.3 अब्ज युरो रोख उत्पन्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, जी मार्चच्या अखेरीस संपलेल्या मागील आर्थिक वर्षातील 4.8 अब्ज युरोपेक्षा कमी आहे.
1,000 कर्मचाऱ्यांची कपात केली
या वर्षाच्या सुरुवातीला व्होडाफोनने इटलीमध्ये 1,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. जर्मनीमध्येही 1,300 कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते. व्होडाफोनसाठी जर्मनी ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
रॉयटर्सच्या अहवालात टेलिकॉम कंपनीची बाजारातील कामगिरी कमकुवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मार्चअखेर या वर्षासाठी गटाची मुख्य कमाई 14.7 अब्ज युरो होती.









