ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वेगात धावणाऱ्या लालपरीची मागची दोन चाके अचानक निखळली. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर दुसरे चाक रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी सुखरुप बचावले. आंबेगाव तालुक्यातील शेवाळेवाडी येथे हा थरार प्रवाशांनी अनुभवला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या परळ डेपोची (एमएच 20 बीएल 3618) ही बस नारायणगावकडे निघाली होती. या बसमधून 35 प्रवासी प्रवास करत होते. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ अचाकन बसची मागच्या बाजूची दोन्ही चाकं निखळली. एक चाक बसच्या पुढे तर दुसरे चाक रस्त्याच्या बाजूच्या ओढय़ात जाऊन पडले. त्यानंतर काही वेळ तीन चाकांवर धावली. बस तिरकी होऊन रस्त्यावरच घासत घासत पुढे गेली. बसचा खालचा भाग घासत गेल्याने मोठय़ा ठिणग्यादेखील उडाल्या. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि नशीब बलवत्तर म्हणून बसमधील 35 प्रवासी बचावले. मात्र, या अपघातामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.









