वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी प्रो लिग स्पर्धेच्या युरोपमध्ये होणाऱ्या पुढील टप्प्यासाठी 24 जणांचा भारतीय पुरुष हॉक संघ जाहीर करण्यात आला असून हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघासाठी आता क्रेग फुल्टॉन हे नवे विदेशी प्रशिक्षक लाभले आहेत.
2023 च्या प्रो लिग हॉकी स्पर्धेच्या यापूर्वी भारतात खेळविण्यात आलेल्या टप्प्यामध्ये भारतीय हॉकी संघाने बलाढ्या आणि विद्यमान विश्वविजेत्या जर्मनी तसेच ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे. आता या स्पर्धेचा युरोपमधील पुढील टप्पा होणार आहे. या टप्प्यात भारतीय हॉकी संघाला लंडनमध्ये बेल्जियम आणि ग्रेट ब्रिटन यांच्याविरुद्ध तसेच त्यानंतर एंडोव्हेन येथे नेदरलँड्स आणि अर्जेटिना यांच्याविरुद्ध सामने खेळावे लागणार आहेत. हॉकी इंडियाने सोमवारी भारतीय हॉकी संघाची घोषणा केली असून गोलरक्षक कृष्णन बहाद्दुर पाठकचे संघात पुनरागमन झाले आहे.
भारतीय हॉकी संघ – गोलरक्षक – कृष्णन बहाद्दुर पाठक, पी. आर. श्रीजेश, बचावफळी – हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, मनप्रीत सिंग, सुमित, संजय, मनदीप मोर, गुरींदर सिंग, मध्यफळी – हार्दिक सिंग (उपकर्णधार), दिलप्रीत सिंग, एम. रवीचंद्र सिंग, समशेर सिंग, आकाशदीप सिंग, विवेक सागरप्रसाद, आघाडी फळी – अभिषेक, ललितकुमार उपाध्याय, एस. कार्ति, गुर्जंत सिंग, सुखजीत सिंग, राजकुमार पाल, मनदीपसिंग, सिमरनजीत सिंग.









