सीमावर्ती भागात कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेत, रेल्वेने उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिह्यातील उरी हे सीमावर्ती शहर रेल्वे नेटवर्कने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित लाईनसाठी जमिनीचे आणि हवाई सर्वेक्षण तीन महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर चालू वर्षअखेरीस काम सुरू होईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली.
‘एलओसी’पर्यंतचा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उरीचा सीमावर्ती भाग रेल्वेने जोडला जाईल. या रेल्वेसेवेमुळे नागरी आणि सुरक्षा दोन्ही हेतूंना फायदा होईल, असे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या काश्मीरमधील बारामुल्ला-उरी विभागाच्या 50 किमी लांबीचे काम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सर्वेक्षणासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत.
नवीन बारामुल्ला-उरी मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण (एफएलएस) सुरू करण्याचा विचार उत्तर रेल्वे करत आहे. त्यासाठी मंत्रालयाकडून प्रस्ताव मागवले जात आहेत. बारामुल्ला ते उरी हा एकूण ट्रॅक 50 किमीचा असेल. हा मार्ग सध्या चालू असलेल्या रेल्वेच्या 130 किमी लांबीच्या बनिहाल-बारामुल्ला विभागात जोडला जाईल. हे जम्मू आणि बारामुल्ला यांना जोडणारा 2002 मध्ये राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मंजूर झालेल्या 356 किमी रेल्वे ट्रॅकच्या व्यतिरिक्त असल्याचे सांगण्यात आले. काश्मीर रेल्वेचे मुख्य क्षेत्र व्यवस्थापक (सीएएम) साकिब युसूफ यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. 2024 च्या अखेरीस काश्मीर कन्याकुमारी रेल्वे लिंकने जोडले जाईल, असे ते म्हणाले.









