सुरक्षा दलांनी दिले चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शनिवारी सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये पहाटे दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, परंतु सतर्क जवानांनी तो हाणून पाडला. लष्कराने घनदाट जंगलाच्या परिसरातून संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये गोळीबारही झाला. तसेच भारतीय लष्कराच्या जवानांनी ‘क्वाडकॉप्टर’ला लक्ष्य केले. यापूर्वी 3 मे रोजी भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. तसेच एप्रिल महिन्यात तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या बाजूने घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी ठार केले होते. लष्करानेही पाकिस्तानचा हा नापाक प्रयत्न हाणून पाडला होता, त्यानंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशनही करण्यात आले होते.









