हिरोशिमाच्या बैठकीत ड्रॅगन विरोधात जारी होणार वक्तव्य : पंतप्रधान मोदी होणार सामील
► वृत्तसंस्था/ हिरोशिमा
जपानमधील शहर हिरोशिमामध्ये 19 मेपासून जी-7 देशांची बैठक होणार आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनुसार या जागतिक समुहाच्या बैठकीत चीनच्या वाढत्या आर्थिक प्रभुत्वावर चर्चा केली जाणार आहे. चीनविरोधात समुहाची सर्व देश एक वक्तव्य जारी करणार आहेत.
संयुक्त वक्तव्यातील एक पूर्ण हिस्सा चीनच्या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या पद्धतींवर असणार आहे. तर यंदा जारी होणारे वक्तव्य मागीलवेळेपेक्षा अधिक कठोर शब्दांचे असणार आहे. जी-7 देशांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होणार आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या विदेश धोरणाचा भर प्रामुख्याने चीनच्या आव्हानाला सामोरे जाण्यावर आहे. परंतु मागील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही जी-7 द्वारे चीनच्या आर्थिक दबदब्यावर प्रश्न उपस्थित केले होते, परंतु त्यावेळी याकडे फारसे लक्ष देण्यात आले नव्हते. मागील महिन्यात जी-7 देशांच्या विदेशमंत्र्यांच्या बैठकीत देखील चीनचा मुद्दा उपस्थित झाला होता.
हिरोशिमामध्ये सुरू होणाऱ्या बैठकीत चीनविरोधात जी-7 देशांच्या एकजुटतेची देखील कसोटी लागणार आहे. मागील महिन्यात चीनच्या दौऱ्यावरून परतल्यावर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिकेच्या विरोधात जात ‘वन चायना पॉलिसी’चे समर्थन केले होते. चीनसोबतच्या संबंधांप्रकरणी आम्हाला अमेरिकेच्या दबावाला दूर सारावे लागणार असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले होते. अशा स्थितीत फ्रान्स जी-7 देशांच्या संयुक्त वक्तव्यात चीनविरोधी भूमिकेपासून वाचण्याचा प्रयत्न करू शकतो.
चीनविरोधी भूमिकेसाठी टाळाटाळ
कराराच्या स्वरुपात सर्व देशांनी चीनविरोधात कठोर पाऊल उचलावे अशी अमेरिकेची इच्छा आहे. तर उर्वरित देश याप्रकरणी अमेरिकेइतकी रुची दाखवत नसल्याची स्थिती आहे. चीनविरोधात जाहीर भूमिका घेणे काही देश टाळत असल्याचे अटलांटिक कौन्सिल जियो इकोनॉमिक सेंटरचे वरिष्ठ संचालक जॉश लिप्सकी यांनी म्हटले आहे. चीनसंबंधी जी-7 च्या सर्व देशांची स्वत:चे असे धोरण आहे. तरीही काही मुद्द्यांवर सर्व देश सहमती राखून असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्याने केला आहे.









