आरपीडी महाविद्यालयात होणार मतमोजणी, तालुक्यात 144 कलम लागू, नागरिकांत उत्सुकता
खानापूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवार दि. 13 रोजी लागणार असून या निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालयात होणार आहे. खानापूर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 12 टेबल करण्यात आले असून त्यातील एक टेबलवर पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर मतपेट्यांची मोजणी करण्यात येणार आहे. तालुक्यात एकूण 255 मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे 11 टेबलवर 23 राऊंडमध्ये ही मोजणी करण्यात येणार आहे. चोवीसाव्या राऊंडमध्ये दोन मतदार संघांची मतमोजणी करण्यात येणार आहे. सकाळी 8 पासून मतमोजणी सुरू होणार आहे. प्रत्येक उमेदवारांच्या एजंटांचे पास वितरित करण्यात आले आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण निकालाची अपेक्षा आहे. तालुक्यात निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागात याबाबतची माहिती देण्यात आली असून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रविवार दि. 14 रोजी सकाळी 7 पर्यंत 144 कलम लागू असल्याने मिरवणूक काढणे तसेच एकत्रित होऊन फिरणे, फटाके फोडणे, दुचाकीवरुन रॅली काढणे तसेच प्रतिकृती मिरवणूक काढणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस खात्याने शहरासह तालुक्यात बंदोबस्तात वाढ केली आहे. निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद, तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक नायक यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.









