वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
किरकोळ महागाई दरात घसरण झाली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर कमी होत 4.70 टक्क्यांवर आला आहे. मार्च महिन्यात हा दर 5.66 टक्के राहिला होता. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दरात घट झाली आहे. किरकोळ महागाई दर आता 18 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे.
एप्रिलमध्ये अन्नधान्याच्या महागाई दरातही घसरण झाली आहे. अन्नधान्य महागाई दर 3.84 टक्के झाला आहे. मार्च महिन्यात हा दर 4.79 टक्के इतका राहिला होता. किरकोळ महागाई दर आता रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित मर्यादेत आला आहे. 6-8 जून या कालावधीत रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणाची बैठक घेतली जाणार आहे. 8 जून रोजी आरबीय पतधोरणाविषयीच्या निर्णयांची घोषणा करणार आहे. अशा स्थितीत महागाईच्या आघाडीवर स्थिती दिलासाजनक राहिल्यास कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.