कोल्हापूर आगाराची बस सुसाट : जलदगतीने धावणाऱ्या बसला प्रवाशांचा प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-कोल्हापूर मार्गावर स्लीपर बससेवा सुरू झाली आहे. कोल्हापूर आगारातून विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. अत्याधुनिक सीट आणि बसमध्ये स्लीपरची व्यवस्था असल्याने प्रवाशांकडून पसंती दिली जात आहे. निपाणी वगळता बेळगाव-कोल्हापूर नॉनस्टॉप ही बस धावत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक परिवहन महामंडळांकडून विशेष बससेवा पुरविल्या जात आहेत. विशेषत: वातानुकूलित आणि स्लीपर बसेसची व्यवस्था केली जात आहे. प्रवाशांना आकर्षक आणि उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी परिवहन कंबर कसताना दिसत आहे. खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करत आरामदायी बसेस उपलब्ध करत आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. महसूल वाढविण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही परिवहन मंडळांकडून वेगवेगळे प्रयोग राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर आगाराने चार दिवसांपासून बेळगाव-कोल्हापूर मार्गावर स्लीपर बस सुरू केली आहे.