वृत्तसंस्था /दुबई
गुरुवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या वनडे सांघिक मानांकन यादीत भारताचे स्थान घसरले आहे. या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाने आपले अग्रस्थान कायम राखले असून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पाक संघाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आतापर्यंत पाचवेळा विश्वचॅम्पियन्स ऑस्ट्रेलियाच्या मानांकन गुणात चांगली सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्याकडून विविध स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी झाल्याने हा संघ 113 मानांकन गुणावरून 118 गुणावर पोहोचला आहे. पाकिस्तान संघाने या यादीत भारताला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. पाकने 116 गुणासह दुसरे तर भारत 115 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. आयसीसीच्या यापूर्वीच्या मानांकनात ऑस्ट्रेलियाचा संघ 113 गुणासह आघाडीवर होता तर भारत काही डेसिमल गुणांच्या फरकाने दुसरा स्थानावर होता. पाकचा संघ यावेळी 112 गुणासह तिसऱ्या स्थानावर होता. अलीकडेच पाक संघाने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 5-0 अशी एकतर्फी जिंकल्याने त्यांना तीन रेटींग गुण मिळाले. 2023 साली भारतात नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होत असल्याने आता वनडेच्या मानांकन शर्यतीत ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाक यांच्यात आघाडीच्या स्थानासाठी खरी चुरस पाहावयास मिळेल. भारतीय संघाला अलीकडेच ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका गमवावी लागली होती. आयसीसीच्या वनडे ताज्या मानांकनात न्यूझीलंड 104 गुणासह चौथ्या, इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. अफगाण संघाने या मानांकन यादीत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. लंकेचा संघ नवव्या तर विंडीज दहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने या मानांकन यादीत सहावे तर बांगलादेशने सातवे स्थान मिळवले आहे.









