वृत्तसंस्था/ ताश्कंद
येथे सुरू असलेल्या विश्व पुरुषांच्या मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे मुष्टीयोद्धे दीपक भोरिया, मोहमद हुसामुद्दीन आणि निशांत देव, यांनी आपल्या वजनगटातून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवत किमान 3 पदके निश्चित केली आहेत.
या स्पर्धेत भारताच्या या तीन मुष्टीयोद्ध्यांनी आपल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती जिंकून तीन कास्यपदके निश्चित केली आहेत. दरम्यान उपांत्य फेरीच्या लढती जिंकल्या तर त्यांना रौप्य किंवा सुवर्णपदकांची आपेक्षा बाळगता येईल. 2019 साली झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या स्पर्धकांनी सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्या स्पर्धेमध्ये अमित पांगलने रौप्यपदक तर मनीष कौशिकने कास्यपदक मिळवले होते.
ताश्कंदमधील स्पर्धेत बुधवारी 51 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दीपक भोरियाने किर्जीस्तानच्या एन. डीयुशबायेव्हचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत या फ्लायवेट गटात पुढील फेरीत स्थान मिळवले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत या फ्लायवेट गटाचा समावेश असल्याने दीपक भोरियाला दर्जेदार कामगिरी करावी लागेल. 57 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या मोहमद हुसामुद्दीनने बल्गेरियाच्या डायेझ इबानेझवर 4-3 अशा गुणफरकाने निसटता विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. हुसाम्दीनने यापुर्वी 2 वेळा राष्ट्रकूल क्रीडा स्पधेंत कास्यपदक मिळवले आहे. 71 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 22 वर्षीय निशांत देवने क्युबाच्या जॉर्ज क्युलेरचा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. गेल्या वेळी झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत निशांतला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली होती. आतापर्यंत झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत एक रौप्यपदकासह एकूण 7 पदकांची कमाई केली आहे.
पुरुषांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत यापूर्वी भारताच्या विजयेंद्र सिंगने 2009 साली कास्यपदक, विकास कृष्णनने 2011 साली कास्यपदक, शिवा थापाने 2015 साली कास्यपदक, गौरव बिदुरीने 2017 साली कास्यपदक, अमित पांगलने 2019 साली रौप्यपदक, कौशिकने 2019 साली कास्यपदक आणि आकाशकुमारने 2021 साली कास्यपदक मिळवले होते.









