पुणे / वार्ताहर :
फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल 20 लाख 83 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
याबाबत फसवणूक झालेल्या एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला बिबवेवाडी परिसरात राहायला आहे. महिलेच्या मोबाइलवर आरोपीने संपर्क साधला होता. त्यानंतर तो या महिलेच्या सातत्याने संपर्कात राहिला. महिलेला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष त्याने दाखवले. त्यानंतर महिलेकडून ऑनलाइन पद्धतीने आरोपीने वेळोवेळी 20 लाख 83 हजार रुपये घेतले. त्यानंतर महिलेला कोणताही परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने आरोपीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. अखेर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दिली. याबाबत पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहे.








