शिवसेना (ठाकरे गट) उपनेते सचिन अहिर
करवीर निवासिनी अंबाबाईचे घेतले दर्शन
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे विचार, भुमिका वेगवेगळी असली तरी एकाच अजेंड्याखाली आम्ही एकत्र आल्याचे शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर असले तरी राजकीय व्यासपीठावर नेत्यांच्या भाषणामध्ये कुठेही विसंवाद नसल्याचेही अहिर यांनी सांगितले.
शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अहिर बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख रवीकिरण इंगवले उपस्थित होते.उपनेते आमदार अहिर म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी एकत्र राहणे काळाची गरज आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता राजकीय कार्यकर्ते यांना महाविकास आघाडीचे महत्त्व लक्षात आले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढणार असल्याचे आमदार अहिर यांनी स्पष्ट केले.
खासदार संजय राऊत आमचे हिरो
खासदार संजय राऊत यांना अनेकजण व्हिलन ठरवत असले तरी ते आमच्यासाठी हिरोच आहेत. ते पहिल्यापासून स्पष्टवक्ते असल्याचे आमदार अहिर यांनी सांगितले.
वज्रमुठ सभा रद्द नाही
महाविकास आघाडीने सुरु केलेली वज्रमुठ सभा रद्द केलेली नाही. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार देताना घडलेली दूर्घटना पाहता या सभा थांबविण्यात आल्या. उन्हाची तीव्रता कमी होताच पुन्हा वज्रमुठ सभा सुरु करणार असल्याचे आमदार अहिर यांनी सांगितले.