म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी आणला प्रकार उघडकीस : मतदारांतून तीव्र नाराजी

बेळगाव : दक्षिण मतदारसंघातील खासबाग येथे मोठ्या प्रमाणात दारुसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली. महत्त्वाचे हा दारूसाठा म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. यामुळे सर्वत्र वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि खासबाग येथील बसवाण गल्लीमध्ये मोठी गर्दी जमली होती. निवडणूक अधिकारी व पोलिसांनी करायचे काम कार्यकर्त्यांनीच केल्याने याबद्दल जोरदार चर्चाही सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाचे वाटप आणि दारू व मटणाच्या जेवणावळी बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. तरुणांना व्यसनाधिन बनविण्यासाठी अशा प्रकारे दारू वाटली जाणार होती. यामुळे मतदारांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वडगाव परिसरात जवळपास सहा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये ही बातमी पसरली होती. म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रचारामध्ये मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे साऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विरोधकांकडून ऑफर दिल्या आहेत. महिला मतदारांना थेट रक्कम वाटण्याचे प्रकारही घडल्याचा आरोप यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे. सहा ठिकाणी आम्ही दारुसाठा पकडला आहे. मात्र निवडणूक अधिकारी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत. यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. निवडणूक अत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन वेळोवेळी बैठका घेत आहेत. मात्र प्रत्यक्षात पारदर्शकपणा नसल्यानचे दिसून येत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दारुसाठा दाखल झाला होता. याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. शेवटी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनीच दारुसाठा पकडून दिला. यामुळे मतदारांतून त्यांचे कौतुक होत आहे.
महिलावर्गातून तरी तीव्र संताप
महिलावर्गातून तरी तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. अशा प्dराकारे दारु देवून तरुणांना व्यसनाधिन बनविण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता स्वच्छ चारित्र्याच्या असलेल्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे असणार असल्याचे यावेळी अनेक महिलांनी स्पष्ट केले. दक्षिण म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारले. मात्र आम्ही गुन्हा दाखल करणार आहे, असे सांगून वेळ मारुन नेली. यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाई करण्याचे आश्वासन
जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता निश्चितच याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारीच या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. आठ दिवसांपूर्वी त्यांची बदली करावी, असे निवेदन देखील देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चितच त्यांची बदली करु, असे सांगितले होते. मात्र तरी देखील ते अधिकारी दारुसाठ्याजवळच थांबून होते. या प्रकारामुळे या निवडणुकीमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
वडगाव मंगाईनगर येथेही सापडला दारूसाठा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना दारू देण्यासाठी मंगाईनगर सहावा क्रॉस, वडगाव येथील घरामध्ये दारूसाठा सापडला आहे. या दारू साठ्या बरोबरच उमेदवाराच्या नावाची पावती देण्याचे यंत्र देखील सापडल्याने साऱ्यांना धक्काच बसला आहे. दक्षिण मतदारसंघामध्ये हा गैरप्रकार उघडकीस आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. खासबागमध्ये दारू सापडल्यानंतर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी इतरत्र कुठे दारू सापडते काय, याची छाननी केली. यावेळी मंगाईनगर येथील सहावा क्रॉस येथील घरामध्ये हा दारू साठा सापडला. यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी त्या दारू साठ्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली. यामुळे खळबळ उडाली आहे. आता या घडलेल्या या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या उघडकीस आलेल्या प्रकारामुळे वडगावसह संपूर्ण दक्षिण मतदारसंघामध्ये खळबळ उडाली आहे.









