आज सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवार दि. 10 मे रोजी होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर नियुक्त केलेले कर्मचारी मंगळवारी रवाना झाले आहेत. जाताना आपल्या साहित्यासह निवडणुकीचे साहित्य कर्मचाऱ्यांना न्यावे लागत होते. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना काहीसा त्रास सहन करावा लागला. क्लब रोडवरील वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानातून निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले. जिल्ह्यातील एकूण 4 हजार 434 मतदान केंद्रांवर हे कर्मचारी रवाना झाले आहेत. काही कर्मचाऱ्यांना चिकोडी येथे पाठविण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर उठून तयारी करून मतदान केंद्रांवर सज्ज राहावे लागणार आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. या सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. वनिता विद्यालयाच्या मैदानावर मोठी गर्दी झाली होती. टप्प्याटप्प्याने नोंद करून या सर्वांना मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले आहे.
निवडणूक यंत्रसामग्री-कर्मचाऱ्यांसाठी बसेस ; शहर-ग्रामीण भागातील बसेसवर वाढला ताण

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दि. 10 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक पारदर्शकपणे घेण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. दरम्यान, मतदान केंद्रांपर्यंत यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी केएसआरटीसीच्या बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अरभावी, गोकाक, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, रामदुर्ग व सौंदत्तीला मंगळवारी बसेस रवाना झाल्या. पहाटे वनिता विद्यालय, यंदेखूट आणि क्लब रोडवरून या बसेस रवाना झाल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस, राखीव दलाचे जवान आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. या सर्वांच्या वाहतुकीसाठी परिवहनच्या बसेस विविध भागात धावू लागल्या आहेत. निवडणूक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांना वेळेत पोहोचविण्यासाठी परिवहनच्या बसेस विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आदी सामग्री मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविली जात आहे. मंगळवारी सकाळपासून या कामाला प्रारंभ झाला. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून दैनंदिन 650 हून अधिक बसेस धावतात. निवडणुकीसाठी काही बसेस बुक झाल्याने शहर व ग्रामीण भागातील इतर बसेसवर ताण वाढला आहे. ग्रामीण भागातील बसेसचा निवडणुकीसाठी वापर केला जाणार आहे. त्यामुळे काही गावातील बसेस बुधवारी बंद राहण्याची शक्यता आहे. एकूणच शहरांतर्गत आणि ग्रामीण भागातील बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे









