224 मतदारसंघांमध्ये 2,615 उमेदवार : राज्यभरात 55,282 मतदान केंद्रे
प्रतिनिधी/ बेंगळूर
गेल्या 15 दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. आता मतदार कोणाच्या हाती सत्तेच्या चाव्या द्यायच्या, हा निर्णय घेणार असून बुधवार दि. 10 मे रोजी 2,615 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. दि. 13 मे रोजी मतमोजणी होईल. राज्यातील सर्व 224 मतदारसंघांमध्ये 16 व्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष काँग्रेस, निजद, आम आदमी पार्टी, कल्याण राज्य प्रगती पक्षासह इतर पक्षांचा कस लागणार आहे.
पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवत राजकीय पक्षांनी दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असलेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले होते. आता मतदानाची तारीख आल्याने सर्व राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांना राजकीय भवितव्याची चिंता लागली आहे. उमेदवारांचे राजकीय भवितव्य बुधवारी मतदार लिहिणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली असून मतदानानंतर मतदानयंत्रे स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवली जातील. मतमोजणीच्या दिवशी ही मतदानयंत्रे स्ट्राँग रूममधून बाहेर काढली जातील. दि. 13 मे रोजी दुपारपर्यंत जय-पराजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
5.31 कोटीपेक्षा अधिक जण हक्क बजावणार
राज्यभरात एकूण 55,282 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून 2615 उमेदवारांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यात 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आहेत. 1 तृतीयपंथी उमेदवारही रिंगणात आहे. एकूण 5,31,33,054 जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात 2,67,28,053 पुरुष मतदार, 2,74,00,074 महिला मतदार आहेत. 4,927 तृतीयपंथी मतदार आहेत.
1.56 लाख पोलीस तैनात
संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांना अधिक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. पोलीस खाते, निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्यात सुरक्षेसाठी 1 लाख 56 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मतदानकाळात कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत यासाठी परराज्यांतूनही पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 464 पॅरामिलिटरी फोर्स, 304 डीवायएसपी, 991 पोलीस निरीक्षकही सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून गृहरक्षक दलाचे जवानही मागविण्यात आले आहेत.
विशेष थीम असणारी मतदान केंद्रे लक्षवेधी
मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी निवडणूक आयोगाने यावेळी मोठ्या प्रमाणात जागृती केली आहे. सायकल फेरी, पथनाट्या, प्रचारफेरी, व्हिडिओ यासह विविध प्रकारे मतदानासाठी जागृती करण्यात आली आहे. विशेष थीम असणारी मतदान केंद्रेही स्थापन करण्यात आली असून ती लक्षवेधी ठरत आहेत. प्रत्येक मतदारसंघात महिला मतदारांसाठी सखी किंवा पिंक बूथ सुरू करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांमध्ये मतदानप्रक्रियेचे चित्रिकरण, वेब कास्टिंग केले जाईल. एकंदरीत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आहे.
मतदारांसाठी विश्रांती खोली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. अलीकडेच नोंदणी केलेल्या 80 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी बॅलेट पेपरद्वारे घरबसल्या मतदान घेण्यात आले आहे.
.भाजप-काँग्रेसमध्येच चुरस
सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. कॉँग्रेस सत्ताविरोधी लाटेचा लाभ उठवून पुन्हा सत्ता काबिज करण्याच्या प्रयत्नात आहे. तर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा सत्तास्थापनेत ‘किंगमेकर’ बनण्याची संधी मिळण्याची आशा बाळगून आहेत. माजी मंत्री आणि खाण सम्राट गाली जनार्दन रे•ाr यांचा नवा पक्ष कल्याण राज्य प्रगती पक्ष कल्याण 15 ते 20 जागा मिळविण्याचा दावा करत आहे. एकंदर भाजप-काँग्रेसमध्ये चुरस दिसून येत आहे.
► 9.17 लाख मतदार प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क
► बेंगळूर शहर मतदारसंघात सर्वाधिक 97,15,109 मतदार
► कोडगू जिल्ह्यात सर्वात कमी 4,02,333 मतदार
► 55,282 एकूण मतदान केंद्रे
► विशेष थीम असणारी मतदान केंद्रे लक्षवेधी
► राज्यात 11,71,558 युवा मतदार
► शारीरिक व्यंग मतदार 5,71,281
► एकूण 75,603 बॅलेट युनिटचा वापर
► 70,300 कंट्रोल युनिटचा वापर
► एकूण 76,202 व्हीव्हीपॅट मशीनचा वापर









