विनाअनुमती कॅम्पसमध्ये न येण्याची सूचना : दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विद्यापीठाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस जारी केली आहे. भविष्यात विनाअनुमती कॅम्पसमध्ये येऊ नये असे या नोटीसद्वारे राहुल गांधींना कळविण्यात आले आहे. विद्यापीठात विनाअनुमती येत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोक्यात आणले हेते. विद्यार्थ्यांसोबत कुठल्याही प्रकारच्या संभाषणासाठी योग्य प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाचे रजिस्ट्रार विकास गुप्ता यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी हे शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये पोहोचले होते. तेथे त्यांनी वसतिगृहात जात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. तसेच वसतिगृहात विद्यार्थ्यांसोबत जेवणही केले होते.
राहुल यांनी विनाअनुमती दौरा केला होता. राहुल यांच्या आगमनावेळी अनेक विद्यार्थी जेवण करत होते. आम्ही हा प्रकार कॅम्पसमध्ये सहन करू शकत नाही. राहुल गांधी यांनी अशाप्रकारच्या कृत्याची पुनरावृत्ती करू नये तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोक्यात आणू नये असे रजिस्ट्रार गुप्ता यांनी म्हटले आहे.
याचदरम्यान काँग्रेसची विद्यार्थी शाखा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयुआय) राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव होता असा आरोप केला आहे. तर रजिस्ट्रारने हा आरोप फेटाळला आहे.









