जळगाव / प्रतिनिधी :
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष विस्तार आणि जिल्हयात पक्ष मजबुती करणासाठी भाजपाकडून तीन जिल्हाध्यक्ष नेमले जाणार आहेत. या नियुक्त्या लवकरच होण्याची अपेक्षा असून, या पदांसाठी पात्र उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे.
आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, लोकसभा, विधान सभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जळगाव जिल्हयाचा विस्तार पाहता भाजपाने संघटनात्मक रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. त्यात जिल्हयातील काहींचा समावेश केला आहे. जिल्हयात रावेर लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ यासाठी असे दोन जिल्हाध्यक्ष यापूर्वी नेमलेले होते. मात्र, जिल्हयाचा विस्तार पाहता संघटनात्मक बांधणी करण्यात पक्षाला मर्यादा येत होत्या. मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जळगावचा दौरा करत जिल्हयातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींवर चर्चा करत अडचणी समजून घेतल्या होत्या. त्यातून आता महानगर जिल्हाध्यक्ष हे एक पद निर्माण होत आहे. यामुळे पक्षाला जिल्हयात तीन जिल्हाध्यक्ष मिळतील ज्यायोगे पक्षाचा विस्तार व मजबुतीकरण करणे सोपे जाईल, असा पक्षाचा विश्वास आहे.
भाजपात पक्षाची वाढलेली कामे आणि कामांचा कार्पोरेट पध्दतीने होत असलेला पाठपुरावा पाहता या जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र पक्षाला पूर्णवेळ देणारी संघटनात्मक आणि राजकीय अनुभव असलेली, पक्षाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवणारी व्यक्ती हवी आहे. शिवाय त्या व्यक्तीकडे आर्थिक पाठबळ असणे गरजेचे आहे. या पदासाठी जे इच्छुक होते. त्यांची प्रदेश कार्यकारीणीत वर्णी लागली आहे. आमदार, खासदारांना संघटनात्मक बाबीत न अडकवण्याचे पक्षाचे धोरण असल्याने आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरू झाला आहे. आज भाजपाकडे जिल्हयातील दोन लोकसभेच्या जागा असून त्या कायम राखण्याचा निर्धार आहे तर विधानसभेच्या तीन जागा असून आहेत त्या वाढवण्यासाठी पक्ष ताकद लावत आहे. या नव्या नियुक्तयांमुळे पक्ष संघटन मजबूत होईल, अशी पक्षाला अपेक्षा आहे.








