खानापूर : खानापूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी गेल्या दीड महिन्यापासून योग्य नियोजन करत कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यात यशस्वी झालेल्या आहेत. काँग्रेसकडे नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांच्या फळीमुळे तालुक्याच्या सर्व कानाकोपऱ्यात मतदारांपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसच्या गॅरंटीसह अंजली निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्यात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे अंजली निंबाळकर यांनी आपण या निवडणुकीत निश्चित विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.
तालुक्यात 1952 नंतर काँग्रेसच्या पहिल्याच महिला आमदाराच्या रुपात अंजली निंबाळकर यांनी काँग्रेसचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2013 साली निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अंजली निंबाळकर यांनी सातत्याने पाच वर्षे तालुक्यात अंजली फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत जनतेपर्यंत पोहचवून आपली एक प्रतिमा निर्माण केली होती. त्याचा फायदा त्यांना 2018 च्या निवडणुकीत झाला. आणि त्या आमदार म्हणून निवडून आल्या. गेल्या पाच वर्षात तालुक्यात विविध विकासकामांचा पाठपुरावा करत शासनाकडून निधी मिळवून घेण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. काँग्रेसने पुन्हा उमेदवार म्हणून संधी दिली आहे. या निवडणुकीत जिंकण्याच्या हेतूनेच त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबविली आहे. प्रियांका गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे. तसेच आमदार अंजली निंबाळकर यांनी स्वत: तालुक्याच्या प्रत्येक गावात कोपरा सभा घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील पारिश्वाड आणि कक्केरी जि. पं. क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे. तर मराठीबहुल लोंढा, नंदगड, गर्लगुंजी, जांबोटी क्षेत्रातील नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करून त्यांच्या माध्यमातून गावोगावी काँग्रेस पोहचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यात नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार झालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. राज्यात काँग्रेस आल्यास निंबाळकर यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अंजली निंबाळकर यांनी निवडणुकीत करो या मरो या भूमिकेतून प्रचार राबवेला आहे.









