वृत्तसंस्था/ लखनौ
आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळं तो आयपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाहीये. त्यानंतर लखनौचा गोलंदाज जयदेव उनादकट याला दुखापत झाल्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यातच आता लखनौच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनौचा मुख्य वेगवान गोलंदाज मार्क वुड याने आयपीएल सोडून मायदेशी म्हणजेच इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता प्लेऑफच्या शर्यती सुरु असतानाच लखनौला तिसरा मोठा धक्का बसला आहे.
वेगवान गोलंदाज मार्क वुडने आयपीएल सोडून इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतल्याने लखनौने याबाबतची माहिती दिली आहे. त्यात मार्क वुडने मायदेशी परतण्याचं कारण सांगितलं आहे. मार्क वुडची पत्नी गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी वुड आयपीएल सोडून इंग्लंडला परतला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मार्क वुड फक्त पाच सामने खेळला असून त्यात त्याने 11 विकेट्स घेतल्या आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एका सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा विक्रमही मार्क वुडने केला आहे. त्यामुळं आता प्लेऑफची शर्यत सुरू झालेली असतानाच मार्क वुड आयपीएल सोडून मायदेशी परतल्यामुळं लखनौ संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.









