न्यूझीलंडचा सिप्ले सामनावीर, पाकचा फखर झमान मालिकावीर
वृत्तसंस्था/ कराची (पाक)
यजमान पाक क्रिकेट संघाने न्यूझीलंड विरुद्धची 5 सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील येथे झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने पाकचा 47 धावांनी पराभव करत पाकला क्लीन स्वीप साधण्यापासून रोखले. न्यूझीलंडच्या हेन्री शिप्लेला ‘सामनावीर’ तर पाकच्या फखर झमानला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. न्यूझीलंडचा डाव 49.3 षटकात 299 डावात आटोपला. त्यानंतर पाकचा डाव 46.1 षटकात आटोपल्याने न्यूझीलंडने हा शेटवचा सामना 47 धावांनी जिंकला. हा शेवटचा सामना दिवस-रात्रीचा खेळविला गेला.
न्यूझीलंडच्या डावात सलामीच्या यंगने 91 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 87, ब्लंडेलने 2 चौकारांसह 15, निकोल्सने 2 चौकारांसह 23, कर्णधार लॅथमने 58 चेंडूत 5 चौकारांसह 59, चॅपमनने 33 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 43, मॅकॉन्चीने 25 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, रचिन रविंद्रने 20 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावा जमविल्या. यंग आणि निकोल्स यांनी दुसऱ्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केली. निकोल्स बाद झाल्यानंतर यंगने लॅथम समवेत तिसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भर घातली. यंग तंबूत परतल्यानंतर लॅथम आणि चॅपमन यांनी चौथ्या गड्यासाठी 56 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या डावात 5 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शाहिन आफ्रिदीने 3, उस्मा मीर आणि शदाब खान यांनी प्रत्येकी 2 तसेच हॅरिस रौफ आणि मोहम्मद वासिम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. पाकने आपले पहिले चार फलंदाज केवळ 66 धावात गमविले. त्यानंतर आगा सलमान आणि इफ्तिकार अहमद यांनी पाचव्या गड्यासाठी 97 धावांची भागिदारी केली. फक्र झमानने 5 चौकारांसह 33, आगा सलमानने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 57, इफ्तिकार अहमदने 72 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 94, उस्मा मीरने 1 षटकार आणि 1 चौकारासह 20, शदाब खानने 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे शिप्लेने 34 धावात 3, रचिन रविंद्रने 65 धावात 3 तर मिल्ने, हेन्री आणि सोधी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकच्या डावात 5 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. पाकिस्तानने मालिका 4-1 ने जिंकली असली, तरी या निकालामुळे ‘आयसीसी’च्या एकदिवसीय क्रमवारीच्या शीर्षस्थानी बदल घडून आला आहे. या पराभवामुळे पाकिस्तानला सदर क्रमवारीतील अव्वल स्थान सोडावे लागले आहे.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड : 49.3 षटकात सर्व बाद 299 (यंग 87, ब्लंडेल 15, निकोल्स 23, लॅथम 59, चॅपमन 43, मॅकॉन्ची 26, रचिन रविंद्र 28, अवांतर 5, शाहिन आफ्रिदी 3-46, उस्मा मीर 2-53, शदाफ खान 2-67, रौफ 1-45, मोहम्मद वासिम 1-24).
पाक : 46.1 षटकात सर्व बाद 252 (फखर झमान 33, शान मसूद 7, बाबर आझम 1, मोहम्मद रिझवान 9, आगा सलमान 57, इफ्तिकार अहमद नाबाद 94, शदाब खान 14, उस्मा मीर 20, अवांतर 10, शिप्ले 3-34, रचिन रविंद्र 3-65, मिल्ने 1-34, हेन्री 1-47, सोधी 1-60).









