वृत्तसंस्था/ मलप्पुरम
केरळ सरकारने मलप्पुरम जिह्यातील तनूरजवळ रविवारी झालेल्या बोट दुर्घटनेच्या सर्वसमावेशक न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांचे विशेष तपास पथकही या दुर्घटनेची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या दुर्घटनेत महिला आणि मुलांसह 22 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख ऊपयांची मदत जाहीर केली. तसेच विविध ऊग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या सर्वांचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले. सध्या आठ जखमींवर विविध ऊग्णालयात उपचार सुरू आहेत.
केरळच्या मलप्पुरम जिह्यातील तनूर भागातील ओट्टुब्रम थुवल थिरम येथे रविवारी संध्याकाळी सुमारे 35 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून 22 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 15 मुले आणि 5 महिलांचा समावेश आहे. या बोट दुर्घटनेत झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख ऊपयांची मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तथापि, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार क्षमतेपेक्षा अधिक लोकांना बोटीमध्ये सामावून घेतल्यामुळे हा अपघात झाला. तसेच बोटीमध्ये पुरेसे लाईफ जॅकेट नसल्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचेही सांगण्यात आले.









