काही ठिकाणी स्थिती नियंत्रणाबाहेर
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडाच्या अल्बटांमध्ये जंगलांमध्ये भडकलेल्या वणव्यामुळे 30 हजार लोकांना स्वत:चे घर सोडणे भाग पाडले आहे. रविवार संध्याकाळपर्यंत तेथील 108 ठिकाणी आग भडकली होती. यातील 31 ठिकाणी स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती अशी माहिती अल्बर्टाच्या वाइल्ड फायर युनिटच्या अधिकारी क्रिस्टी टकर यांनी दिली आहे. आग विझविण्यासाठी हेलिकॉप्टर आणि एअर टँकरचा वापर करण्यात येत आहे. तर या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
धूर आणि आगीमुळे मालमत्तांच्या नुकसानीची माहिती देणे सध्यातरी अवघड आहे. लोकांचा जीव वाचविणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे क्रिस्टी यांनी म्हटले आहे. अल्बर्टा प्रांतात आगीच्या संकटामुळे आणीबाणी जाहीर करावी लागली आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे मदत अन् बचावकार्यावर नजर ठेवून आहेत. वणव्यामुळे आतापर्यंत 3 लाख एकराहून अधिक क्षेत्रातील जंगल जळून खाक झाले आहे. ड्रायटन व्हॅली सर्वाधिक प्रभावित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात 140 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असल्याने आग वेगाने फैलावत आहे.









