गोडोली / प्रतिनिधी :
शासनाने आकृतीबंध निर्णयावर अंमलबजावणी करावी, वर्ग २ च्या पदोन्नती व्हाव्यात, कळसकर समितीचा अहवालाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ८ मे रोजी सकाळी दोन तास निदर्शने करून लेखणी बंद आंदोलन केले. सातारा कार्यालयातील सर्व २४ कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन ते यशस्वी केले. मात्र कराडच्या कार्यालयातील कर्मचारी यात सहभागी झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आकृतीबंध निर्णयाला मान्यता दिली होती. त्या संदर्भात २३ सप्टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. त्याला सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटुनही आकृतीबंधाच्या निर्णयावर कोणतीही अंमलबजावणी होत नाही. त्याबद्दल कारणांची माहिती ही शासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. आकृती बंधाचा निर्णय लागू झाल्यानंतर पदोन्नतीचे सत्र सुरू होईल, असे शासनाने लेखी दिले आहे. परंतु पदोन्नती संदर्भातील प्रक्रिया कमालीचे मंदावली आहे. यासाठी कर्मचारी संघटनेने या मागण्या प्रलंबीत मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज स. १० ते १२ या वेळेत सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या समोर जोरदार निदर्शने करून लेखणी बंद आंदोलन केले.