ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एका 33 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात घडला. याप्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी मुख्तार खान (42 वर्ष, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल परिसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्तार पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला छत्रपती संभाजीनगरमधील टाऊन हॉल परिसरात वास्तव्यास आहे. आरोपी मुख्तार हा पीडित महिला रस्त्यावरून येत-जात असताना तिला अश्लील हातवारे करायचा. मात्र, महिला त्याकडे दुर्लक्ष करायची. एक दिवस मुख्तारने या महिलेचा पाठलाग करत तिला गाठले. तिथे तिच्या मुलांचे अपहरण करुन पतीला मारहाण करण्याची धमकी तिला दिली. त्यानंतर तिला घरी भेटण्यासाठी येण्यास भाग पाडले.
पीडित महिला मुख्तारच्या घरी भेटण्यासाठी गेली असता त्याने तिला गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर या महिलेवर त्याने अनैसर्गिक अत्याचार केला. त्यावेळचा एक व्हिडिओही त्याने बनवला. पीडितेला शुद्ध आल्यावर तिला या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. मुख्तारच्या कृत्याने पीडिता प्रचंड घाबरली होती. तिला मानसिकदृष्टय़ा खचल्याचे पाहून नातेवाइकांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात मुख्तारवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच मुख्तार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.









