उचगाव/ वार्ताहर-
गांधीनगर येथील कचरा डेपोला आग लागून कचरा विघटन करणारे ट्रोमेल मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.आगीत सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की,गांधीनगरआणि वळीवडे हद्दीतील कचरा म्हसोबा माळ परिसरात डम्पिंग केला जातो.त्याला रविवारी आग लागली.बघता बघता आगीने कचरा विघटन करणाऱ्या मशीननेही पेट घेतला. ती आग विझवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व सदस्यांनी अग्निशमन दलास पाचारण केले.स्वत: टँकरने पाणीपुरवठा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दलित महासंघाचे कार्यकर्ते, गांधीनगर ग्रामपंचायतीचे काही सदस्यांनी यांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.पण धुराचे लोट इतके प्रचंड होते की तेथील वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये धुर गेल्याने वयोवृद्धांचा आणि लहान बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. वारंवार पेटणाऱ्या या कचरा डेपोचा प्रश्न सोडवण्यासाठी वळिवडे व गांधीनगर या दोन्ही ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनेमुळे भविष्यात कचरा डेपोच्या आसपास असणारी मसोबा माळ झोपडपट्टी आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची दुर्घटना होऊ शकते.आग विझविण्यासाठी घटनास्थळी सरपंच संदिप पाटोळे, उपसरपंच पूनम परमानंदानी, माजी सरपंच रितू लालवानी,दलित महासंघाचे राजू कांबळे, अनिल हेगडे,ग्रामपंचायत सदस्य सनी चंदवानी, दीपक जमनानी,सुशांत महाजन आदींनी प्रयत्न केले.

ग्रामपंचायत सदस्यांना धरले धारेवर
हिंद ऍग्रो केमिकल या कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर कचरा विघटनासाठी ट्रोमेल मशीन बसवले होते.पण दोन्ही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे काही दिवसापासून कचरा विघटीकरण बंद आहे.नागरिकांनी कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारंवार कळवूनही त्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे.या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथील नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्यांना धारेवर धरले.









