
फोंडा : फोंडा नगरपालिकेच्या 15 पैकी 10 जागा जिंकून बहुमताचा आकाडा पार केल्यानंतर आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी मतदारांनी विकासाच्या बाजुने मतदान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. नागरिकांनी भाजपाच्या उमेदवारांवर जो विश्वास दाखवला, त्याची पूर्तता करण्यासाठी पुढील पाच वर्षे आमचे पालिका मंडळ फोंडा शहराच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहे. सध्या राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे, त्यामुळे विकासाचे प्रकल्प राबविताना निधीची कमतरता भासणार नाही. महसूल वाढीसाठी नागरिकांवरही करांचा बोजा लादला जाणार नाही. पुढची पाच वर्षे ही विकासाची असतील व सर्व पंधराही प्रभागांमध्ये कुठलाच भेदभाव न करता हा विकास केला जाईल, असे रवी नाईक यांनी सांगितले.
आमचे काम सुऊच राहणार : डॉ. केतन भाटीकर

डॉ. केतन भाटीकर म्हणाले, मगो रायझिंग फोंडा पॅनलचे जरी 4 उमेदवार विजयी झाले, तरी तीन ते चार जागांवर आमच्या उमेदवारांनी अटीतटीची टक्कर दिली. या निवडणुकीत भाजपाच्या सर्व ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांनी ताकद लावली तरीही मगो पॅनलच्या बहुतेक उमेदवारांनी त्याला आपल्या ताकदीनुसार टक्कर दिली. आम्हाला अपेक्षित जागा जिंकता आल्या नसल्या तरी फोंड्यातील नागरिकांसाठी आमचे काम सुऊच राहणार आहे. या पराभवातून खचून न जाता यापुढे अधीक चांगले प्रयत्न केले जातील.









