
फोंडा : शांतीनगर प्रभाग 1 मध्ये रॉय नाईक व मगो पॅनलचे नंदकुमार डांगी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत रॉय यांनी 32 मतांनी बाजी मारली. सांताक्रूझ प्रभाग 3 मध्ये भाजपा पॅनलच्या ज्योती अरुण नाईक व मगो पॅनलच्या शेरल डिसोझा यांच्यात अशीच काटेकी टक्कर झाली व त्यात ज्योती नाईक अवघ्या 3 मतानीं विजय झाल्या. दुर्गाभाट, वरचाबाजार प्रभाग 10 मध्ये माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शांताराम कोलवेकर यांच्या पत्नी दिपा कोलवेकर व मगो पॅनलच्या मनस्वी परेश मामलेकर यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत दीपा कोलवेकर केवळ एका मताने विजय झाल्या. शांतीनगर प्रभागमध्ये माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका गीताली तळावलीकर व माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांची मुलगी संपदा नाईक यांना समान 402 मते मिळाली. दोनवेळा फेरमतमोजणी करुनही निकाल समान राहिल्याने अखेर चिठ्ठीद्वारे काढलेल्या निकालात गीताली या नशीबवान ठरल्या. सलग तिसऱ्यांदा निवडून येत त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. प्रभाग 14 मधून विजयी झालेले विद्यमान नगरसेवक आनंद नाईक यांना सर्वाधिक मते 612 मते मिळली. या प्रभागात एकूण 825 मतदान झाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी मगो पॅनलचे अनिल नाईक यांना केवळ 197 मते मिळाली आहेत.

भाजपाचे दळवी, पुनाळेकर बिनविरोध
भाजपाच्या फोंडा नागरीक समिती पॅनलने या निवडणुकीत सर्वाधिक 10 जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला असला तरी त्याची नांदी मतदानापूर्वीच झाली होती. भाजपा पॅनलचे प्रभाग 7 मधील उमेदवार विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी आणि प्रभाग 13 च्या उमेदवार विद्या पुनाळेकर या बिनविरोध निवडून आल्या. दळवी यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.
विजयी उमेदवारांमध्ये सात नवीन चेहरे
या निवडणूकीत प्रभाग 1 मधून रॉय नाईक, प्रभाग 3 मधून ज्योती अरुण नाईक, प्रभाग 6 मधून शौनक बोरकर, प्रभाग 8 मधून प्रतिक्षा प्रदी नाईक, प्रभाग 9 मधून रुपक देसाई, प्रभाग 10 मधून दीपा शांताराम कोलवेकर, प्रभाग 11 मधून वेदिका विवेकानंद वळवईकर हे नवीन चेहरे निवडून आले आहेत. त्यापैकी प्रतिक्षा नाईक व वेदिका वळवईकर हे दोन उमेदवार मगो पॅनलचे असून उर्वरीत सर्व भाजपा पॅनलचे आहेत.
व्यंकटेश नाईक चौथ्यांदा विजयी
सर्वाधिक चारवेळा व सलग निवडून येण्याचा मान प्रभाग 4 चे विजयी उमेदवार व माजी नगराध्यक्ष व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांना लाभला. मागील तीन निवडणुकांमध्ये विजयाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर यंदा चौथ्यांदा ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.









