जनावरांसाठी साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान
बेळगाव : बेकिनकेरे येथे शनिवारी रात्री अचानक दोन गवतगंज्यांना आग लागून चार ट्रॉली गवत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या घटनेने खळबळ माजली असून कोणी तरी जाणूनबुजूनच आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. जनावरांचा वर्षभराचा चाऱ्याचा साठा करून ठेवला होता. मात्र, अचानक गवतगंज्यांना आग लागून नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. मारुती यल्लाप्पा यळ्ळूरकर व मल्लाप्पा शंकर रेडेकर यांच्या गवतगंजींना आग लागली आहे. या आगीत तब्बल चार ट्रॉली गवत जळून खाक झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. घराच्या परसात ठेवण्यात आलेला सुका चारा जळाल्याने आता जनावरांना काय घालावे? असा प्रश्नदेखील या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
चारा जळून खाक झाल्याने अडचणीत वाढ
रात्रीच्या अंधारात आगीचे लोळ निदर्शनास आल्यानंतर आरडाओरडा करण्यात आली. त्यानंतर आजूबाजूला असलेले नागरिक आणि तरुण धावत गवतगंज्याकडे आले. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन मोठ्या गवतगंज्या जळून खाक झाल्या. दरम्यान, अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र, तोपयर्तिं गवतगंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. शेतीला जोडधंदा म्हणून या शेतकऱ्यांनी पशुपालन केले आहे. मात्र, जनावरांसाठी साठलेला चाराच जळाल्याने या शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. तलाठी, ग्राम पंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.









