कोंबड्या-पिले दगावण्याचे प्रमाण वाढल्याने पोल्ट्रीचालकांना आर्थिक फटका
बेळगाव : उन्हाचा पारा वाढू लागला असून मानवाबरोबर पशुपक्ष्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. पारा 39 अंशांच्या पुढे जात असल्याने पोल्ट्री व्यवसायावर देखील याचा परिणाम होऊ लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीतील कोंबडीची पिले दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्रीचालकांना आर्थिक फटका बसू लागला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अलीकडे पोल्ट्रीचालकांची संख्या वाढली आहे. पशुसंगोपन खात्याच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात 881 पोल्टीफार्म आहेत. या पोल्ट्रीफार्ममध्ये पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शिवाय नवीन पिलेदेखील पोल्ट्रीचालक आणत आहेत. मात्र, वाढत्या उष्म्याचा या कोंबड्यांच्या पिलांवर परिणाम होऊ लागला आहे. पोल्ट्रीत दाखल झाल्यानंतर काही दिवसातच पिले दगावत असल्याने फटका बसू लागला आहे. पोल्ट्रीचालकांना कोंबडीच्या पिलांसाठी पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, पोल्ट्रीत आल्यानंतर मरतुकीचे प्रमाण वाढत असल्याने अडचणी येत आहेत. एकूण कोंबडी खाद्य, विद्युत, पाणी, वैद्यकीय खर्च यावर अधिक खर्च केला जातो. मात्र, पिले दाखल झाल्यानंतरच दगावत असल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत येऊ लागला आहे.
दर वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा
वाढत्या उष्म्यामुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ लागला आहे. यामध्ये लहान पिले दगावू लागली आहेत. पक्ष्याचे वजन एक किलोच्या घरात आल्यानंतर पुढचे अडीच ते तीन आठवडे त्याची काळजी घ्यावी लागते. या काळात आहार आणि वातावरणदेखील पोषक असणे गरजेचे आहे. मात्र, वाढत्या उष्म्यामुळे एका पोल्ट्रीफार्ममधून दररोज एक ते दोन कोंबड्या दगावू लागल्या आहेत. त्यामुळे चालकांना फटका बसू लागला आहे. निवडणुकीमुळे चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. दरम्यान, चिकनला समाधानकारक दर देखील मिळू लागला आहे. मात्र, कोंबड्या मोठ्या होण्याआधीच दगावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. 160 वरून चिकनचा दर प्रतिकिलो 210 रुपये झाला आहे. तब्बल 50 रुपयांनी प्रतिकिलो दर वाढला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पोल्ट्रीतील कोंबड्या आणि पिले दगावू लागल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत.









