एकाच कुटुंबातील 11 मुलांचा मृत्यू : शाळा-रुग्णालये गेली वाहून
► वृत्तसंस्था/ किंशासा
आफ्रिकेतील कांगो देशात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले असून पूरसंकट निर्माण झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 176 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण किवू प्रांतातील कालेहे भागात 4 मे रोजी एका नदीची पातळी वाढल्याने पूरसंकट निर्माण झाले आहे. या पुरात न्यामुकुबी गावातील 11 मुले वाहून गेली आहेत.
पुरामुळे अनेक घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शाळा, महाविद्यालये पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. पेयजल आणि विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. आतापर्यंत 176 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढू शकतो. 100 हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती किवू प्रांताच्या गव्हर्नरांनी दिली आहे. तर स्थानिक संघटनेनुसार या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 226 जणांना जीव गमवावा लागला आहे. अनेक भागांमध्ये बचावकार्य सुरू आहे. भूस्खलनामुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक लोक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत.
कांगोचा शेजारी देश रवांडामध्ये देखील मोठे नुकसान झाले आहे. 2 मेपासून येथे सुरू असलेल्या पावसामुळे पूर अन् भूस्खलनाची आपत्ती ओढवली आहे. रवांडामध्ये आतापर्यंत 130 जणांचा मृत्यू झाला असून 5 हजारांहून अधिक घरे जमीनदोस्त झाली आहेत. पश्चिम प्रांतात सुमारे 17 रस्ते, 26 पूल वाहून गेले आहेत.









