वृत्तसंस्था / अमृतसर
अमृतसर येथे शीखांचे पवित्र तीर्थ स्थान असणाऱ्या सुवर्णमंदीर परिसरात बाँब स्फोट करण्यात आला आहे. या स्फोटात सहाजण जखमी झाले आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सुवर्णमंदीर परिसरात असणाऱ्या हेरीटेज मार्गावर हा स्फोट करण्यात आला. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली.
रात्री उशीराची वेळ असल्याने भाविकांची संख्या या परिसरात कमी होती. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. तसेच जिवितहानीही न झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, स्फोटाचा दणका मोठा होता. त्यामुळे आसपासच्या काही इमारतींच्या काचा तडकल्याचे वृत्त आहे. अत्याधुनिक स्फोटाकाचा उपयोग करण्यात आला असावा असे प्राथमिक अनुमान आहे. गुन्हा विज्ञान शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी पोहचून पाहणी केली. हा दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न होता काय, याची चौकशी सुरु असून आत्ताच नेमके कारण सांगता येणार नाही, अशी माहिती अमृतसरचे पोलीस आयुक्त नौनिहाल सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
जखमी झालेल्या सर्व मुली
या स्फोटात जखमी झालेल्या सर्व शाळकरी मुली आहेत. त्या ऑटोरिक्षातून जात असताना मार्गावर हा स्फोट झाला. त्वरित सोशल मिडियावर या स्फोटाचे वृत्त वेगाने पसरल्याने घबराट निर्माण झाली. स्फोट घडविणाऱ्यांनीच हे वृत्त सोशल मिडियावर प्रसारित केले असण्याची शक्यता नाही. समाजात घबराट पसरविण्याच्या हेतूने हा स्फोट आणि ते वृत्त प्रसारित करण्याचा प्रकार घडला असावा. अमृतसर पोलीस पुढील तपास करत असून लवकरच स्फोटाचे रहस्य उलगडले जाईल. तसेच तो घडविणाऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक केली जाईल. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.









