भगवंत त्यांच्या सगुण मूर्तीचा पूजाविधी सांगताना म्हणाले, पूजक जर सकाम म्हणजे फळाची इच्छा करणारा असेल तर, पूजासाहित्य यथासांग पाहिजे. पूजेच्या साहित्यात काही कमी असेल तर फळही संपूर्ण मिळत नाही. काही भक्त मात्र पूजा करण्यातून कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाहीत. त्याना निष्काम भक्त म्हणतात. त्यांच्या पुजासाहित्यात काही कमी असले तरी चालते कारण भगवंताला उपचारापेक्षा भावच आवडत असतो. अशा वेळी विनासायास जे काय मिळेल, तेवढ्या साहित्यामध्ये जरी भक्ताने पूजा केली तरी भगवान् संतुष्ट होतो. उद्धवा! तोच पूजायाग यथोक्त होय. निष्काम वृत्ती असली म्हणजे फल, मूल, दुर्वा किंवा निर्मळ पाणी एवढ्यानेच म्हणजे सद्भावानेच सगळा पूजाविधी सफळ होतो. जेथे माझ्यावरील प्रेमभाव दृढ असतो, तेथे इतर उपचारांची काय प्रतिष्ठा? भक्तांचा भावच मला गोड वाटतो, त्यायोगे माझ्या भक्तालाही महासुखाचा लाभ होतो. विशेष म्हणजे, जे काही बाह्योपचार करावयाचे, ते प्रतिमा किंवा मूर्तीच्या पूजेलाच करतात आणि मानसपूजेमध्ये तर ह्या उपचारांना काहीच तोटा नसतो. कारण तेथे मनच माझी मूर्ती होते आणि उपचाराचे साहित्यही मनोमयच असते. भक्त ही उपचारसंपत्तीसुद्धा माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न करता मला अर्पण करत असतात. त्यामुळे मी श्रीपती संतुष्ट होतो. षोडशोपचारे पूजा, उपलब्ध वस्तू देवाला अर्पण करून केलेली पूजा व मानसपूजा यात मानसपूजा सर्वश्रेष्ठ आहे कारण या पूजेत भक्ताचे संपूर्ण चित्त देवाच्या सगुण रुपाशी एकरूप होते. मानसपूजा करण्यासाठी मनाशिवाय इतर कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते. षोडशोपचारे पूजेसाठी जी सामग्री प्रत्यक्षात गोळा केली जाते ती मानसपूजेत मनातल्या मनात गोळा करून मनानेच पूजा करायची असते. षोडशोपचारे करावयाच्या पूजेत आवश्यक ते सर्व साहित्य गोळा करणे श्रमाचे आणि खर्चिक असते तर मानसपूजेत या सर्व साहित्याच्या संकलनाची मनाने कल्पना करून देवाची पूजा करायची असते. त्यामुळे दुर्लभ साहित्यसुद्धा सहजी गोळा केले जाते. मानसपूजेत देवाच्या सगुण मूर्तीशी भक्त लवकर एकाग्र होतो. माझी आठ पूजास्थाने कोणती ती तुला मी सांगितली. तसेच सकाम पूजा, निष्काम पूजा आणि मानसपूजा याबद्दलही आपली चर्चा झाली. आता माझ्या आठ पुजास्थानांचा सविस्तर पूजाविधी तुला सांगतो. प्रतिमामूर्ती हे पहिले पूजास्थान आहे. त्या मूर्तीला जो महाभिषेक करतात, त्यालाच ‘स्नान’ असे म्हणतात. याप्रमाणे मूर्तीचे स्नान झाल्यावर मुगुट आदिकरून सर्व प्रकारचे अलंकार तिला घालावेत आणि श्रद्धापूर्वक श्रीहरीची पूजा करावी. स्नान, भोजन, अलंकार इत्यादि सर्वोपचारांसहित यथासांग पूजा करणे हाच प्रतिमापूजेचा प्रकार होय. आता स्थंडिलाचा विचार ऐक. स्थंडिल म्हणजे यज्ञवेदी. स्थंडिलावर तत्त्वांचे ध्यान करून त्यावर तत्वविन्यासाचे लेखन करावे. हेच त्याचे पूजाविधान होय. अग्नीची पूजा करताना माझे ध्यान करून तुपाची आहुती देऊन होम करणे हेच अग्नीचे पूजाविधान होय. अग्नी हा देवाचे मुख आहे अशा पूर्ण श्रद्धेने हविर्द्रव्याचे हवन करणे हेच ‘अग्निपूजन’ होय. सूर्यामध्ये प्रकाशमान होणारा मंडळात्मा जो सूर्यनारायण, त्याची सौरमंत्राने पूजा व स्तवन करावे. हेच ‘सूर्य’ पूजाविधान होय. ‘आप’ म्हणजे पाणी हे साक्षात नारायणस्वरूपच आहे. त्याचे यथोचित पूजाविधान म्हटले म्हणजे जलामध्येच जलाने तर्पण करणे हे होय. ‘हृदयामध्ये’ जे माझे पूजास्थान आहे, तेथे मनानेच मनाची पूजा करावयाची असते. मूर्ती मनोमयच असते. माझे मुख्य अधिष्ठान म्हटले म्हणजे ब्रह्ममूर्ती ‘ब्राह्मण’ होत. त्यांचे दासत्वाने आज्ञापालन करणे हेच त्यांचे पूजाविधान होय. ब्रह्मालाही ज्याच्यामुळे ब्रह्मपण येते, तो ‘सद्गुरु’ तर माझे सर्वोपरी श्रेष्ठ होय. त्याचे पूजन म्हणजे आपण सर्वस्वी जिवाभावाने त्याला अनन्य शरण जाणे आणि त्याच्या वचनाला प्राण विकणे होय.
क्रमश:








