ग्लेन फिलिप्स ठरला गेम चेंजर, अभिषेक शर्माचे अर्धशतक : बटलर, सॅमसन यांची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ जयपूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या थरारक सामन्यात अब्दुल समदच्या शेवटच्या चेंडूवरील निर्णायक षटकाराने सनरायजर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सचा 4 गड्यांनी पराभव केला. 7 चेंडूत 25 धावा झोडपणाऱ्या हैदराबादच्या ग्लेन फिलिप्सला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात हैदराबाद संघाने 20 षटकात 6 बाद 217 धावा जमविल्या. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 2 बाद 214 धावा केल्या होत्या.

अनमोलप्रित सिंग, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, क्लासेन, ग्लेन फिलिप्स तसेच अब्दुल समदच्या समयोचित फलंदाजीमुळे सनरायजर्स हैदराबादने बलाढ्या राजस्थान रॉयल्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला. अनमोलप्रित सिंग आणि अभिषेक शर्मा या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 35 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली. अनमोलप्रित सिंग बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माला राहुल त्रिपाठीने चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 6.5 षटकात 64 धावांची भागिदारी केली. अभिषेक शर्माने 34 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 55 धावा जमविल्या. क्लासन आणि त्रिपाठी यांनी 41 धावांची भर घातली. चहलने क्लासनला झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 26 धावा जमविल्या. चहलने हैदराबादला आणखी एक धक्का देताना त्रिपाठीचा बळी मिळविला. त्याने 29 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 47 धावा झोडपल्या. कर्णधार मार्करम 6 धावांवर पायचीत झाला. चहलचा हा चौथा बळी ठरला.

17.5 षटकात हैदराबादने 5 बाद 174 धावा जमविल्या होत्या. हैदराबादला 12 चेंडूत विजयासाठी 41 धावांची गरज होती. दरम्यान ग्लेन फिलिप्सच्या आक्रमक फटकेबाजीने सामन्याला कलाटणी मिळाली. कुलदीप यादवने हे 19 वे षटक टाकले. या षटकात त्याने 24 धावा दिल्या. ग्लेन फिलिप्स या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. तत्पूर्वी फिलिप्सने केवळ 7 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 25 धावा जमविल्या.
शेवटच्या षटकामध्ये हैदराबादला विजयासाठी 17 धावांची गरज होती. हे शेवटचे षटक संदीप शर्माने टाकले. या षटकात पहिला पाच चेंडूत 12 धावा निघाल्याने शेवटच्या चेंडूवर त्यांना 5 धावाच्ंााr गरज होती. समदने संदीपला उत्तुंग फटका मारला. पण लाँगऑफवर त्याचा झेल टिपला गेला. मात्र पंचांनी नोबॉलचा इशारा दिला आणि हैदराबादला लाईफलाईन मिळाली. शेवटच्या चेंडूवरील फ्री हिटवर समदने षटकार ठोकत हैदराबादला नाट्यामय विजय मिळवून दिला.
हैदराबादच्या डावात 13 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. राजस्थानतर्फे यजुवेंद्र चहलने 29 धावात 4 तर कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. स्पर्धेच्या गुणतक्त्यात राजस्थान रॉयल्सने चौथे स्थान मिळविताना 11 सामन्यातून 10 गुण नोंदविले आहेत. तर सनरायजर्स हैदराबाद 10 सामन्यातून 8 गुणासह शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे.
सॅमसन, बटलर यांची अर्धशतके
कर्णधार संजू सॅमसन आणि जोस बटलर यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 215 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 214 धावा जमविल्या. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या सलामीच्या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. या जोडीने 30 चेंडूत 54 धावांची भागिदारी केली. राजस्थानचे पहिले अर्धशतक 26 चेंडूत फलकावर लागले. हैदराबादच्या मार्को जान्सेनने जैस्वालला नटराजनकरवी झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 35 धावा फटकवल्या. राजस्थानने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 61 धावा जमविताना एकमेव गडी गमविला होता.
जैस्वाल बाद झाल्यानंतर बटलर आणि सॅमसन यांनी षटकामागे 10 धावांची गती राखली होती. या दोघांनी राजस्थानचे शतक 58 चेंडूत फलकावर लावले. बटलरने केवळ 32 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. राजस्थानच्या 150 धावा 80 चेंडूत फलकावर लागल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठीची शतकी भागिदारी 60 चेंडूत पूर्ण केली. डावातील 19 व्या षटकात भुवनेश्वर कुमारने बटलरला पायचीत केले. बटलरने 59 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह 95 धावा झळकाविल्या. त्याचे शतक 5 धावांनी हुकले. राजस्थानचे द्विशतक 116 चेंडूत फलकावर लागले. कर्णधार सॅमसनने 33 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. सॅमसनने 38 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 66 तर हेटमायरने 5 चेंडूत नाबाद 7 धावा जमविल्या. राजस्थानला अवांतराच्या रुपात 11 धावा मिळाल्या. त्यामध्ये 5 वाईड चेंडूंचा समावेश आहे. हैदराबादतर्फे भुवनेश्वर कुमार आणि जान्सेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. राजस्थानच्या डावात 11 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक – राजस्थान रॉयल्स : 20 षटकात 2 बाद 214 (जैस्वाल 18 चेंडूत 35, बटलर 59 चेंडूत 95, सॅमसन 38 चेंडूत नाबाद 66, हेटमायर 5 चेंडूत नाबाद 7, अवांतर 11, भुवनेश्वर कुमार 1-44, मार्को जान्सेन 1-44). सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकात 6 बाद 217 (अनमोलप्रित सिंग 25 चेंडूत 33, अभिषेक शर्मा 34 चेंडूत 55, राहुल त्रिपाठी 29 चेंडूत 47, हेन्रीच क्लासेन 12 चेंडूत 26, मार्करम 5 चेंडूत 6, फिलिप्स 7 चेंडूत 25, अब्दुल समद 7 चेंडूत नाबाद 17, जान्सेन 2 चेंडूत नाबाद 3, अवांतर 5, यजुवेंद्र चहल 4-29, कुलदीप यादव 1-50, रवीचंद्रन अश्विन 1-35).









