किंझल क्षेपणास्त्रावर मात : पुतीन यांचा दावा ठरला खोटा
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनच्या वायुदलाने केलेल्या कामगिरीमुळे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचा संताप वाढणार आहे. युक्रेनच्या वायुदलाने अमेरिकेच्या पॅट्रियट संरक्षण यंत्रणेचा वापर करत कीव्हच्या आकाशात रशियाचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र र्किजल नष्ट पेले आहे. युक्रेनने रशियाच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एकाला इंटरसेप्ट करत नष्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेकडून पॅट्रियट संरक्षण यंत्रणा अलिकडेच युक्रेनच्या सैन्याला मिळाली आहे.

किंझल सारख्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राला युक्रेनच्या राजधानीवर हल्ल्यापूर्वीच इंटरसेप्ट करण्यात आले होते. युक्रेनने पॅट्रियट सुरक्षा यंत्रणेचा पहिल्यांदाच वापर केला आहे. आम्ही ‘असाधारण’ किंझर क्षेपणास्त्र नष्ट केले आहे. केएच-47 क्षेपणास्त्र मिग-31 विमानाद्वारे डागण्यात आले होते. या क्षेपणास्त्राला रशियाने डागले होते आणि पॅट्रियट क्षेपणास्त्राने ते उद्ध्वस्त केले आहे अशी माहिती युक्रेनच्या वायुदलाचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनी दिली आहे.
किंझल क्षेपणास्त्र हे रशियाच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांपैकी एक आहे. आकाशातून डागण्यात येणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 2 हजार किलोमीटरपर्यंत असल्याचा दावा रशियाचे सैन्य करते. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा 10 पट अधिक वेग गाठत असल्याने ते रोखणे अशक्य असल्याचे मानले जाते. भूमिगत बंकर्स आणि पर्वतीय भुयारांमधील लक्ष्य नष्ट करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम असल्याचा रशियाचा दावा आहे.
किंझल क्षेपणास्त्र रोखण्यासाठी आवश्यक साधनसामग्री नसल्याचे युक्रेनने यापूर्वी म्हटले होते. पॅट्रियट एक जुने अमेरिकेचे शस्त्र असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. परंतु आता पॅट्रियट एका सुपर हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या विरोधातही प्रभावीपणे काम करू शकते हे सिद्ध झाले असल्याचे उद्गार युक्रेनच्या वायुदलाचे प्रवक्ते यूरी इहनाट यांनी काढले आहेत. किंझल क्षेपणास्त्र यशस्वीपणे रोखणे म्हणजेच रशियाला थप्पड लगावण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनला एप्रिल महिन्याच्या अखेरीस पॅट्रियट क्षेपणास्त्रांची पहिली खेप मिळाली होती. युक्रेनच्या सैन्याला किती पॅट्रियट यंत्रणा मिळाल्या आणि त्या कुठे तैनात करण्यात आल्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिका, जर्मनी आणि नेदरलँड्सने युक्रेनला ही यंत्रणा पुरविल्याचे मानले जात आहे.









