आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसेची पार्श्वभूमी : भाजप आमदाराची सर्वोच्च न्यायालयात धाव
► वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये आता हिंसा थांबली असली तरीही स्थिती सामान्य होण्यास अजून काही कालावधी लागणार आहे. चूराचांदपूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून 10 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली. लोकांना स्वत:च्या गरजेची सामग्री खरेदी करता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. तर सकाळी 10 वाजल्यावर सैन्य आणि आसाम रायफल्सने पूर्ण जिल्ह्यात ध्वजसंचलन केले आहे. 27 एप्रिल रोजी चूराचांदपूर जिल्ह्dयातूनच हिंसेला सुरुवात झाली होती.
तर मणिपूर उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात भाजप आमदार डिंगांगलुंग गंगमेई यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 19 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने मणिपूर सरकारला मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीच्या श्रेणीत सामील करण्यावर विचार करण्याचा निर्देश दिला होता. याच आदेशाच्या विरोधात झालेल्या निदर्शनांनंतर हिंसा भडकली होती. या हिंसेमागे म्यानमारमधून कार्यरत फुटिरवादी संघटनांचा हात असल्याचे मानले जात आहे.

मणिपूर येथील हिंसेत आतापर्यंत 54 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सैन्यानुसार आतापर्यंत सर्व समुदायाच्या 23 हजारांहून अधिक लोकांना वाचवत सैन्य शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. राज्यात सुरक्षादलांच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार आणखी 20 तुकड्या राज्यात पाठविणार आहे.
सर्वपक्षीय बैठक
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी राज्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेतली आहे. सर्व लोकांना पक्षीय राजकारण बाजूला ठेवत तणाव कमी करणे आणि स्थिती सुरळीत करण्यासाठी काम करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
भाजप आमदाराची याचिका
मैतेई समुदाय हा आदिवासी नाही आणि याला कधीच अशा स्वरुपात मान्यता देण्यात आलेली नाही. उच्च न्यायालयाने स्वत:च्या अधिकारक्षेत्राबाहेर जात आदेश दिला आहे. आरक्षणासंबंधी केवळ राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. उच्च न्यायालयाचा आदेश अवैध असून तो रद्द केला जावा अशी भूमिका भाजप आमदार डिंगांगलुंग गंगमेई यांनी घेतली आहे. आरक्षणासंबंधीचा मुद्दा राजकीय असून यात उच्च न्यायालयाची कुठलीच भूमिका नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आदिवासींदरम्यान गैरसमज निर्माण होत तणाव वाढला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती द्यावी अशी मागणी आमदाराने केली आहे.
नीट परीक्षा लांबणीवर
राज्यातील स्थिती पाहता नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने राज्यात नीट-युजीची परीक्षा लांबणीवर टाकली आहे. मणिपूर सेंटर असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढील काळात होणार आहे. राज्यातील 1100 विद्यार्थ्यांनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे. मणिपूरच्या सुमारे 38 लाख लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक हिस्सेदारी मैतेई समुदायाची आहे. मणिपूरच्या सुमारे 10 टक्के क्षेत्रफळात फैलावलेल्या इंफाळ खोऱ्यात मैतेई समुदाय बहुल आहे. मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास नागा आणि कुकी समुदायाने विरोध दर्शविला आहे.









