पुणे / प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या निवडीसाठी एकूण 27 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे 17 अर्ज हे विज्ञान शाखेतील दिग्गजांचे आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उद्धव भोसले यांच्यासह विद्यापीठाचे विद्यमान प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचेही नाव शॉर्ट लिस्टेड झाले आहे.
कुलगुरूपदासाठीचे बहुतांश पात्र उमेदवार हे विद्यापीठातील आहे. अधिष्ठातांमध्ये डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर यांच्यासह विज्ञान लेखक आणि नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राचे संचालक डॉ. संजय ढोले, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदेश जाडकर, माजी प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, डॉ. विजय खरे, डॉ. अविनाश कुंभार, डॉ. राजू गच्चे, डॉ. विलास खरात आदींचा समावेश आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा. अशोक महाजन, प्रा. एम. एस. पगारे आणि प्रा. बी. व्ही. पवार, तर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. अशोक चव्हाण आणि डॉ. एम. बी. मुळे यांचीही नावे शॉर्ट लिस्टेड झाली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या प्रा. संजय चव्हाण प्रा. श्रीकृष्ण महाजनांचाही अर्ज
मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉली सनी, प्रा. पी. ए. महानवर, प्रा. संजय देशमुख यांचाही यात समावेश आहे. तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून प्रा. संजय चव्हाण, प्रा. श्रीकृष्ण महाजन, प्रा. विजय फुलारी यांनीही अर्ज केले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून प्रा. जिपक पानसकर, उमरग्यातील श्री छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्रा. धनंजय माने, नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेशचंद्र शिंदे, लाणारेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रा. एस. बी. देवसारकर हेदेखील स्पर्धेत आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) येथे 18 आणि 19 मे रोजी मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आहे.








