पुणे / प्रतिनिधी :
दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळामुळे अंदमान-निकोबार बेटांवर सोमवारपासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मच्छीमार तसेच प्रवासी बोटींना या परिसरात बंदी घालण्यात आली आहे.
दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर व लगतच्या भागात सध्या हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. 8 मेपर्यंत या स्थितीचे कमी दाबाच्या क्षेत्रात, तर 9 मेनंतर वादळात रुपांतर होण्याचा अंदाज आहे. वादळ उत्तरेकडे प्रवास करत मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचेल. या वादळाच्या प्रभावामुळे 8 ते 12 मेच्या दरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा इशारा आहे. यात काही भागात ऑरेंज ऍलर्टही आहे. हवामान विभाग या स्थितीकडे लक्ष ठेवून आहे. दरम्यान, या क्षेत्राकडे बाष्प ओढले जात असल्याने देशभरातील बहुतांश भागात कमाल तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे.
या वर्षीचे पहिले वादळ
यावर्षीचे हे पहिले वादळ असून, याला मोचा असे नाव दिले आहे. हे नाव येमेन या देशाने दिले आहे.
कोकण-गोव्यात पाऊस
गुजरात तसेच कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात 9 मेपर्यंत वादळी वाऱयासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.









