मेष
कामांचा व्याप वाढल्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या, अशी अवस्था होण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्या, वागण्यामुळे घरातील ज्येष्ठ किंवा वृद्ध व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्तम असेल. वैवाहिक जीवनामध्ये चढ-उतार संभवतो. एखाद्या व्यक्तीने आयत्यावेळी मदत केल्यामुळे फायदा होईल.
-गंगाजल जवळ ठेवा.
वृषभ
या आठवड्यात स्वभावातील काही दोष असल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा. विशेषत: रागीट स्वभावाच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असेल. कामाच्या ठिकाणी वाद संभवतात. आर्थिक दृष्ट्या इच्छापूर्तीचा काळ आहे. आठवड्याच्या शेवटी घडलेल्या घटनेने बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
-तुळशीला गंगाजल घालावे.
मिथुन
या आठवड्यामध्ये कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. घरात एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई गडबड करण्यापासून दूर रहा. चूक होऊ शकते. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीबद्दल काहीही बोलण्याच्या भानगडीत पडू नका.
-हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी.
कर्क
भावनिक आवेगामध्ये घेतलेला कोणताही निर्णय घातक सिद्ध होऊ शकतो. या आठवड्यामध्ये तब्येतीला हर प्रकारे जपावे लागेल. अंगदुखी किंवा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. नको त्या ठिकाणी खर्च झाल्याने मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
-पांढऱ्या गाईला हिरवा चारा घालावा.
सिंह
करायला गेलो एक आणि झाले वेगळेच, असा काहीसा अनुभव या आठवड्यामध्ये येऊ शकतो. कोणालाही आर्थिक मदत करत असताना सावध राहणे गरजेचे आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचे प्रेशर वाढल्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. नोकरदार वर्गाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
-जल दान करावे
कन्या
या आठवड्यामध्ये हे करू की, ते करू, अशी द्विधा मनस्थिती अनुभवायला मिळेल. त्यावेळी बऱ्याच लोकांचा सल्ला घेण्यापेक्षा एकाच योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल घडताना पहायला मिळतील. तुमच्या मागे तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोक करण्याची शक्यता आहे. सावध रहा.
-धार्मिक स्थळी नारळ ठेवावा.
तूळ
आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल नसल्याने कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. आठवड्याच्या मध्याला काही संधी अशा मिळतील की, त्यांचा भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. मंगल कार्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. त्याकरता प्रवास करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सगळ्यांवर अति विश्वास ठेवू नका.
– जोडीदाराला सुगंधी फुले भेट द्यावी
वृश्चिक
हा आठवडा अत्यंत अनुकूल असण्याची शक्यता आहे. जी कामे अडकली होती किंवा काही माणसांनी जाणून बुजून अडकवली होती, ती मार्गी लागतील. विशेष म्हणजे आरोग्य चांगले राहील. गेले काही दिवस आरोग्याच्या समस्या त्रास देत होत्या, त्या कमी होतील. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल.
-लाल गाईची सेवा करावी
धनु
करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीकरता प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी प्राप्त होतील. काहींना इक्रिमेंट किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यताही आहे. पैशांच्या बाबतीमध्ये काळजी करण्याची गरज नाही.
-पाऱ्याची गोळी जवळ ठेवावी.
मकर
एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वक्तव्याने तुमच्या मनाला त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी इतर लोकांच्या कुरापतीमुळे कामांमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. अंतर्गत राजकारणाचा त्रास होईल. तब्येतीच्याबाबतीत निष्काळजीपणा करू नका. विविध मंगल कार्यांमध्ये भाग घेतल्यामुळे पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
-गरजूला दूध दान द्या
कुंभ
‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या ओळीचा प्रत्यय तुम्हाला या आठवड्यामध्ये येईल. आपली विचारसरणी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा, चांगल्या प्रकारे यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात मानसन्मानाची प्राप्ती होईल. आर्थिक आवक उत्तम असेल. कामाच्या ठिकाणी तुमची योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल.
-गरजू व्यक्तीला वस्त्रदान करावे
मीन
मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये सगळ्या बाजूनी सावध राहणे गरजेचे असेल. कामाच्या ठिकाणी इतरांनी केलेल्या चुकांचा परिणाम तुमच्यावर होण्याची शक्यता आहे. कोणत्याही विभागापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. नवीन संधी प्राप्त होतील, पण त्याकरता चांगल्या प्रकारच्या तयारीची गरज आहे.
–जलचरांना खाणे घालावे
आर्थिक समस्या दूर होण्याकरता एका गाडग्यामध्ये सव्वा किलो हिरवे मूग घालून गाडग्याचे तोंड हिरव्या कापडाने बांधावे, दुसऱ्या गाडग्यामध्ये सव्वा किलो मीठ घालून गाडग्याचे तोंड पांढऱ्या कापडाने बांधावे. ही दोन्ही गाडगी घराच्या ईशान्य दिशेला ठेवावीत.





