तांत्रिक अडचणी आल्याने राज्यभरातील बदली प्रक्रिया लांबणीवर
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली तरी शिक्षक बदली प्रक्रियेची अंमलबजावणी लवकर होणार नाही. कारण नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतरच बदली प्रक्रियेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
मागील सहा महिन्यांपासून राज्यातील शिक्षक बदली प्रक्रिया रखडली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात बदली प्रक्रियेसाठी कौन्सिलिंग घेण्यात येणार होते. या बदली प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने संपूर्ण राज्यभरातील बदली प्रक्रिया रखडली. तेव्हापासून आतापर्यंत बदली प्रक्रियेचे घोडे पुढे सरकलेले नाही.
बदली प्रक्रियेला आचारसंहितेचा खो
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे शहरी भागातील अतिरिक्त शिक्षकांची रिक्त असणाऱ्या जागांवर बदली होणार आहे. यासाठी परस्पर बदली संदर्भातील अर्ज मागविण्यात आले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून स्थगिती मिळाल्याने ही प्रक्रिया थंडावली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी होत होती. परंतु, आचारसंहितेमुळे बदली प्रक्रियेला पुन्हा एकदा खो बसला.
नवीन सरकारकडून मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया
राज्यात एकूण 45 हजार 516 शिक्षकांची बदली होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. आचारसंहिता 15 मे रोजी संपणार असली तरी त्यानंतर सरकार अस्तित्वात येऊन त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.









