वार्ताहर/ खडकलाट
येत्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर खडकलाट पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवानंद बनिकोप्प व गुन्हे विभागाच्या उपनिरीक्षिका सुमलता असंगी यांच्या मार्गदर्शनाखाली खडकलाट व चिखलव्हाळ येथे पथसंचलन करण्यात आले. प्रारंभी येथील चनम्मा सर्कलमध्ये बीएसएफएसएसबी व आरपीएफच्या सुमारे 200 जवानांचे उपनिरीक्षकांनी स्वागत केले. यानंतर बसस्थानक, छ. शिवाजी महाराज माध्यवर्ती चौक, सुभाष चौक, पेठलाईन, रंगिला सर्कल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कुंभार गल्ली, चिंचणे गल्ली, कोरवी गल्ली, कमते गल्ली, वाळवे गल्ली करून पथसंचलन ग्रामपंचायत कार्यलयाजवळ आले. गावातून फेरी काढत असताना ग्रामस्थांच्याकडून पुष्पवृष्ठी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यलयाजवळ पथसंचलनाची सांगता करण्यात आली. या ठिकाणी उपनिरीक्षक शिवानंद बनिकोप्प यांनी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था मोडणाऱ्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.









