► वृत्तसंस्था/ किंशासा
आफ्रिकन देश काँगोमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तसेच बऱ्याच भागात पूरसदृश स्थिती असून आतापर्यंत 170 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण किवू प्रांतातील कालेहे भागात 4 मे रोजी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूर आला होता. त्यामुळे बुशुशू आणि न्यामुकुबी गावात पाणी तुंबले होते. येथील पुरामुळे संपूर्ण गावात नासधूस झाली असून एकाचा परिवारातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 100 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. अनेक भागात बचावकार्य सुरू आहे.

पूर आणि भूस्खलनामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. भूस्खलनाच्या घटनेत अजूनही काही लोक गाडल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच पुरामुळे येथील अनेक घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शाळा, रूग्णालयांनाही या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. वीजपुरवठाही ठप्प झाला असून पिण्याच्या पाण्याची समस्याही तीव्र झाली आहे.
काँगोच्या शेजारील देश रवांडामध्येही मोठा विध्वंस झाला आहे. 2 मेपासून सुरू झालेल्या पावसाने येथेही पूर आणि भूस्खलनाचे स्वरूप धारण केले होते. आतापर्यंत येथे 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. 5 हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बाधित भागांना मदत करण्यासाठी सरकारने मदत सामग्री पाठवली असून बचावकार्यही सुरू आहे.









