प्रत्येक देशाचा स्वत:चा ध्वज असतो, ही बाब सर्वांना माहिती आहे. हा ध्वज या देशाची विशिष्ट ओळख असते. शाळेत असताना भूगोल या विषयात प्रत्येक विद्यार्थ्याला विविध देश आणि त्यांचे ध्वज लक्षात ठेवावे लागतात. परीक्षेत काही गुणांसाठी देश आणि ध्वज यांची जोडी जुळविण्याचा प्रश्नही असतो. बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना हा किचकट प्रकार वाटतो. त्यामुळे भूगोल हा कित्येकांचा नावडता विषय असतो. देश, त्यांच्या राजधान्या आणि त्यांचे ध्वज लक्षात ठेवणे हे त्यांच्यासाठी जिकीरीचे असते. अशीबशी त्यांची तयारी केली जाते.
तथापि, मलेशिया देशातील अमिर्ता मतीवान नामक विद्यार्थिनी याला अपवाद आहे. तिने एक जागतिक विक्रम केला आहे. अवघी चार मिनिटे आणि एकवीस सेकंदांमध्ये तिने 254 देशांचे ध्वज अचूकपणे ओळखल्याने तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय तीन वेगवेगळ्या संघटनांनीही तिच्या या असामान्य स्मरणशक्तीची परीक्षा घेऊन दुजोरा दिला आहे. तिचे वय सध्या अवघे 8 वर्षांचे आहे. अडीचशेहून अधिक देशांचे ध्वज ओळखणारी ती जगातील सर्वात कमी वयाची विद्यार्थिनी बनली आहे.
तिने भूगोलाचा अभ्यास गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरु केला आहे. सर्व देश आणि त्यांचे ध्वज यांची ओळख तिला अवघ्या दोन महिन्यांपूर्वी झाली. एवढ्या कमी कालावधीत ती सर्व देशांचे ध्वज ओळखण्यात तयार झाली आहे. तिच्या या अभ्यासात तिच्या आईचेही तिला मोठेच सहाय्य होत आहे.









