चीन या देशासंबंधी प्रत्येकाच्या मनात कुतुहल आहे. हा देश पोलादी पडद्याआड असल्याने येथील जनजीवन, लोकांच्या भावभावना, त्यांची मते, आवडीनिवडी यांच्या संदर्भात अधिक माहिती जगाला नसते. तेथील राज्यकर्ते जितकी माहिती पुरवितात, तितकीच प्रसिद्ध होते आणि जगाला समजते. तेथील लोक अतिशय असंवेदनशील असावेत, असाही समज इतर देशांमधील अनेकांचा असतो.
अशा चीनमधील एक अतिशय भावनात्मक घटना नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ती अर्थातच चीनच्याच नूडू नामक माध्यमाने दिली आहे. एका आजीने आपल्या घरातील कुत्रा, त्याचा त्रास होतो म्हणून विकायला काढला. त्याला ग्राहकही मिळाले. आजीने हा कुत्रा 1,200 रुपयांना विकून टाकला. तथापि, या कुत्र्यावर या आजीच्या नातीचे निरतिशय प्रेम होते. आपला लाडका कुत्रा आता आपल्यासोबत असणार नाही, ही कल्पनाच तिला सहन झाली नाही. तिने अक्षरश: रडून गोंधळ घातला. जेवणखाण सोडले. कुत्र्याला ती आपल्या जवळ घेऊन बसली. त्याला सोडायलाच ती तयार झाली नाही. ही सर्व कहाणी चीनच्या सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली आहे. आजी आपल्या नातीसमोरच कुत्र्याची किंमत ठरविताना दिसत आहे. तर नात कुत्र्याला छातीशी घट्ट धरुन रडत बसली आहे, असे दृष्य मिडियावर बरेच लोकप्रिय झाले आहे. पण अखेर कुत्र्याचा व्यवहार झाल्याने तिला ग्राहकाला तो द्यावा लागला. त्यावेळी तिच्या रडण्याचा पारावार उरला नाही. ती धाय मोकलून रडू लागली. पण तिच्या आजीला तिची दया येत नव्हती. तसेच ग्राहकाची दयाबुद्धीही जागृत झाली नाही. अखेर ग्राहकाने हा कुत्रा नेलाच. हे दृष्य बघताना अनेक चीनी नागरीकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते. अनेकांनी आजी आणि ग्राहक या दोघांनाही बरीच दूषणे दिली होती. इतर देशांमध्येही हा व्हिडीओ प्रसारित झाला असून अशीची प्रतिक्रिया येत आहे.









